क्रिकेटविश्वात शोककळा, मुंबईचे दिग्गज फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांचे निधन

मुंबईच्या दिग्गज फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक उत्कृष्ट फिरकीपटू म्हणून त्यांचे नाव घेतले जात असे, मात्र दुर्दैवाने त्यांना राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. तरीही, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी आपल्या अप्रतिम कामगिरीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली असून अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

डावखुरा फिरकीपटू असलेल्या शिवलकर यांनी वयाच्या 22व्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. ते जवळजवळ 50व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळले. 1960 ते 1988 या कालावधीत त्यांनी 124 प्रथम श्रेणी सामने खेळून 589 विकेट्स घेतल्या. रणजी ट्रॉफीमध्ये त्यांनी 361 विकेट्स मिळवल्या आणि 11 वेळा 10 विकेट हाॅल घेण्याचा पराक्रम केला.

मुंबईच्या संघासोबत त्यांनी 10 वेळा रणजी ट्रॉफी जिंकली. सात वर्षांच्या कालावधीनंतर त्यांनी पुनरागमन करून 47व्या वर्षी दोन सामने खेळले. त्यांच्या अप्रतिम फिरकीमुळे अनेक मोठ्या फलंदाजांना अडचणीत टाकले.

2017 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्यांना प्रतिष्ठित सीके नायडू ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले. सुनील गावस्कर यांनी त्यांच्यावर मोठा विश्वास ठेवला होता, परंतु भारतीय संघात त्यांना संधी मिळू शकली नाही, ही त्यांचीच नव्हे, तर अनेक चाहत्यांचीही खंत राहिली. त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटविश्वाला मोठी हानी झाली आहे. पद्माकर शिवलकर यांचे योगदान कायम स्मरणात राहील.

Comments are closed.