‘पद्मविभूषण पं. जसराजजी’ पुस्तकाला उत्कृष्ट ‘वाङ्मय निर्मिती’ पुरस्कार
नुकताच उत्कृष्ट ‘वाङ्मय निर्मिती’2026 – आशीर्वाद पुरस्कार प्रदान सोहळा दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे पार पडला. या ‘उत्कृष्ट वाड्मय निर्मिती’ स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी छापील पुस्तके व ई बुक सन 2024 व सन 2025 मध्ये प्रकाशित झालेले साहित्य वंदना प्रकाशन, मुंबई या संस्थेतर्फे मागविण्यात आले होते. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तराखंड ही राज्ये व जर्मनी, न्यूझीलंड व सिंगापूर या देशांमधून एकूण 390 व ई-बुक 46 पुस्तके प्राप्त झाली. यातून निवड करीत ई- बुक साहित्य प्रकारात या वर्षी डॉ. विजया टिळक (मराठी नाट्यसंगीत स्वरूप व समीक्षा), डॉ. हर्षवर्धन यादव (भारतविषयक आंतरराष्ट्रीय संबंध), श्रीपाद काळे (अनुवादक – ऋग्वेद), संजीवनी कुलकर्णी (संस्कृत नाटक – मृच्छकटिकम), डॉ. अनंत पावसकर (पद्मविभूषण पं जसराजजी) या साहित्यिकांना गौरविण्यात आले. आशीर्वाद पुरस्कार निवड समितीचे परीक्षक व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनील सावंत यांनी या साहित्याचे अवलोकन केले. यातील डॉ. अनंत पावसकर यांचे ‘पद्मविभूषण पं. जसराजजी’ हे पुस्तक विशेष आहे. संगीतक्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱया पंडीतजींचे चरित्र ई-बुक स्वरूपात आल्याने जगभरातल्या संगीतरसिकांपर्यंत ते निश्चित पोहोचेल. गेली 27 वर्षे हा पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो आणि छापील व ई-बुक स्वरूपातील सािहत्याचा उदंड प्रतिसाद या सोहळ्याला लाभतो.
Comments are closed.