पेन्कीला केळी 'किल'
![medicines Drugs](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/medicines-Drugs-696x447.jpg)
आजकाल जरा काही दुखायला लागले की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लगेच पेन किलर घेतली जाते. पेन किलरमुळे तत्काळ बरे वाटते. ही पेन किलर शरिरासाठी हानिकारक असल्याचे माहीत असतानाही सर्रासपणे पेन किलर टॅबलेट घेतल्या जातात. मात्र, सतत पेन किलर घेणे आरोग्यासाठी परिणामकारक असून, यामध्ये किडनी निकामी होण्याचा धोका उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलरच्या टॅबलेट घेणे टाळा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा डोकेदुखी किंवा थकवा, अंगदुखी, हलका ताप यांसारखे हलके दुखणे जरी उद्भवले तरी अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून पेन किलर टॅबलेट घेऊन खातात. पेन किलर तात्पुरत्या स्वरूपात शरीराची वेदना, ताप आणि जळजळ कमी करते. त्यामुळे पेन किलर सेवन करण्यावर भर दिला जातो. हलकेसे दुखणे उद्भवले तरी दुखण्यातून आराम मिळावा, यासाठी पेन किलर औषधावर भर दिला जातो व हळूहळू पेन किलर घेण्याची सवय जडते. मात्र, सतत पेन किलर औषधांचा वापर करणे शरीरासाठी विशेषतः मूत्रपिंडासाठी हानिकारक ठरू शकते. तसेच सातत्याने पेन किलर घेतल्यामुळे हार्टअॅटक, स्ट्रोकचाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पेन किलरची औषधे घेत असताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असते. जर, ही औषधे जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने घेतली गेली तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात.
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास त्याचा मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो. तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांमुळेही किडनीचे आजार उद्भवण्याची शक्यता असते. याबरोबरच धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्यांचे नुकसान होत असल्याने मूत्रपिंडातील रक्तप्रवाह कमी होऊन त्याचा किडनीच्या कार्यावर परिणाम होण्यास सुरुवात होते. त्यामुळे किडनीचे विकार उद्भवू नयेत, यासाठी भरपूर पाणी पिणे, सकस आहार घेणे, नियमित व्यायाम करणे यांसारख्या सवयी अंगीकारणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
सतत पेन किलरची औषधे घेणे आरोग्यासाठी 11 धोकादायक आहे. पेन किलरच्या अतिसेवनामुळे किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काहीवेळा किडनी निकामी होण्याची गंभीर समस्या उद्भवू शकते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलर घेणे टाळायला हवे.
– डॉ. धैर्यशिल कणसे, कार्डिओलॉजिस्ट
Comments are closed.