दोन दिवसांआधी उर्वरित आशिया चषकातून माघार घेण्याची धमकी; पाकिस्तान आज यूएईविरुद्ध सामना खेळणार?

पाक विरुद्ध युएई एशिया कप 2025: आशिया चषकात (Asia Cup 2025) 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 7 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी सामना संपल्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. टीम इंडियाच्या खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची चांगलीच झोंबली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने थेट आयसीसीकडे तक्रार करत सामन्यातील मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. तसेच मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी न केल्यास आम्ही 17 सप्टेंबर रोजी होणारा युएईविरुद्धचा सामना खेळणार नाही. उर्वरित आशिया चषकातून माघार घेऊ, अशी धमकीही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली होती. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ही मागणी आयसीसीने फेटाळून लावली. त्यामुळे पाकिस्तान युएईविरुद्धचा (Pak vs UAE) सामना खेळणार की नाही?, पाकिस्तान आशिया चषकातून माघार घेणार का?, याबाबत चर्चा रंगली आहे. यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तान आज यूएईविरुद्ध सामना खेळणार?

आयसीसीला धमकी देऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तोंडावर पडल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तान युएईविरुद्धचा सामना खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने उर्वरित आशिया चषकातून माघार घेतल्यास त्यांना जवळपास 105 ते 141 कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं.

पीसीबीचे वार्षिक बजेट सुमारे 227 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स-

पीटीआयच्या वृत्तानुसार, पीसीबीचे वार्षिक बजेट सुमारे 227 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. अशा परिस्थितीत, 16 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या थेट 7 टक्के असेल. पाकिस्तान आधीच आर्थिक संकट आणि क्रिकेटची कमी होत असलेली लोकप्रियता या समस्येशी झुंजत आहे, अशा परिस्थितीत हे नुकसान बोर्डासाठी मोठा धक्का ठरेल.

भारत सुपर 4 मध्ये दाखल- (Team India In Super 4)

आशिया चषकातील अ गटात भारतानं दोन्ही मॅचमध्ये विजय मिळवला आहे. यूएई आणि पाकिस्तानवर भारतानं विजय मिळवत 4 गुण मिळवले.

आशिया कपमधील उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक-

17 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध यूएई
18 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
19 सप्टेंबर – भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 आणि अंतिम सामना-

20 सप्टेंबर – बी1 विरुद्ध बी2
21 सप्टेंबर – ए1 विरुद्ध ए2
23 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी1
24 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी2
25 सप्टेंबर – ए2 विरुद्ध बी2
26 सप्टेंबर – ए1 विरुद्ध बी1
28 सप्टेंबर – अंतिम सामना

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

Ind vs Pak Asia Cup 2025: फायनल जिंकूनही ट्रॉफी घेणार नाही…; हस्तांदोलन टाळल्यानंतर सूर्यकुमार यादवने आता कोणती डिमांड ठेवली?

आणखी वाचा

Comments are closed.