पाकिस्तान एअर फोर्सला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
वीस टक्के पायाभूत सुविधा नष्ट, अनेक युद्धविमाने जागेवरच भस्मसात, बसला मोठाच दणका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानवर चढविलेल्या घणाघाती हल्ल्यात पाकिस्ताच्या वायुदलाच्या 20 टक्के पायाभूत सुविधा नष्ट झाल्या असून त्या देशाची अनेक युद्धविमाने जागेवरच उध्वस्त झाली आहे, अशी माहिती आता बाहेर येत आहे. यामुळे पाकिस्तानला जबरदस्त दणका बसला असून या हानीतून सावरण्यासाठी त्याला बराच कालावधी आणि पुष्कळ पैसा खर्च करावा लागेल, अशी स्थिती आहे. भारताच्या या हल्ल्याचा आचंबा इतर देशांनाही वाटत आहे.
भारताने पाकिस्तानच्या सर्वात महत्वाच्या 11 वायुतळांवर वेगवान आणि अचूक प्रहार केले. भारताच्या क्षेपणास्त्रांच्या तडाख्यात यांच्यापैकी 9 तळ पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. या तळांवर पाकिस्तानची अनेक युद्ध विमाने लॉक करुन ठेवण्यात आली होती. त्यांच्यापैकी अनेक विमानांची मोठी हानी झाली असून ती आता उपयोगाच्या योग्यतेची राहिलेली नाहीत, अशी माहितीही उपलब्ध होत आहेत.
20 टक्के पायाभूत सुविधा नष्ट
पाकिस्तानच्या वायुदलाच्या पायाभूत सुविधांना मोठा दणका बसला आहे. 20 टक्के सुविधा पूर्णत: नष्ट झाल्या आहेत. सरगोधा आणि भोलारी येथील वायुतळांवर पाकिस्तानने अनेक एफ 16 आणि जेएफ 17 विमाने आणून ठेवली होती. त्यांच्यापैकी अनेक विमाने नष्ट झाली आहेत. त्यांची नेमकी संख्या आत्ताच कळणार नाही. पण पाकिस्तानचे वायुदल आता मोठ्या प्रमाणात कमजोर झाले आहे, हे निश्चितपणे मानले जात आहे. ही हानी भयानक आहे.
भारताचा नवा विक्रम
या अभियानात भारताच्या वायुदलाने एक नवा विक्रम केला आहे. एखाद्या अण्वस्त्रधारी देशाच्या 11 वायुतळांवर हल्ले करुन ते नष्ट करण्याचा हा विक्रम आहे. केवळ 9 मे आणि 10 मे या दोनच दिवसांमध्ये भारताच्या पराक्रमी वायुदलाने ही कामगिरी केली असून असे जगाच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. पाकिस्तानची अनेक विमाने नष्ट केल्याचे भारतीय सेनादलांनीही स्पष्ट केले आहे.
अनेक वायुसैनिकही ठार
भारताच्या प्रहारामुळे केवळ विमाने आणि पायाभूत सुविधा यांचीच हानी झालेली नाही. तर पाकिस्तानच्या वायुदलाचे किमान 50 सैनिक आणि काही अधिकारी ठार झाले आहेत. विशेषत: भोलारी येथील वायुतळावरच्या हल्ल्यात मानवहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफ आणि चार युद्धविमान चालक ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अनेक विमाने नष्ट झाल्याने पाकिस्तानला अतिशय मोठ्या संकटाला भविष्यातही सामोरे जाण्याची वेळ येईल. त्या देशाच्या सुरक्षितेतेविषयीच शंका निर्माण झाली आहे, असे उघड होत आहे.
कोणत्या वायुतळांवर हल्ला…
नूर खान, रफिकी, मुरीद, सुक्कूर, सियालकोट, परसूर, चुनियान, सरगोधा, स्कार्दू, भोलारी आणि जेकोबाबाद या वायुतळांवर अतिशय प्रभावी आणि विध्वंसक हल्ले भारताकडून करण्यात आले आहेत. विशेषत: जेकोबाबाद आणि भोलारी हे तळ कसे पूर्णत: भस्मसात झाले आहेत, हे उपग्रहीय छायाचित्रांवरुन पहावयास मिळत आहे. ही हानी कल्पनातीत आहे, असे आता तज्ञही म्हणून लागले आहेत.
इस्रोची भूमिका महत्वाची
या संपूर्ण संघर्षात भारताच्या वायुदलाला आणि इतर सैन्य दलांनाही भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) भारतनिर्मित उपग्रहांचे मोठेच साहाय्य झाले आहे. या उपग्रहांनी पाकिस्तानच्या सर्व तळांचे नेमके स्थान स्पष्ट केले. त्यामुळे नेमका कोठे आणि किती हल्ला करायचा याचा निर्णय घेणे भारताला शक्य झाले, ही बाब आता जागतिक पातळीवर मान्य होऊ लागली आहे. एकंदर, भारताचे हे अभियान अभूतपूर्व पद्धतीने गाजविले आहे, हे निश्चित असे मानले जात आहे.
प्रचंड हानीमुळे पाकिस्तानची भंबेरी
ड भारतीय वायुदलाच्या अचूक हल्ल्यांमुळे पाकिस्तानचे वायुदल सुन्न
ड अनेक युद्धविमाने नष्ट झाल्याने पाकिस्तान वायुदलाचा शक्तीपात
ड भारतीय वायुदलाला अचूक मारा करण्यात इस्रो उपग्रहांचे मोठे साहाय्य
ड पाकिस्ताने पुन्हा कुरापत काढल्यास भारत देणार याहीपेक्षा मोठा दणका
Comments are closed.