हिंदुस्थानच्या कुठल्याही कोपऱ्यात घुसून लढण्याची क्षमता, पाकिस्तानी सैन्याची धमकी

‘भविष्यात हिंदुस्थानशी संघर्ष झालाच तर तो महाप्रलय घेऊन येईल. पाकिस्तान किंचितही मागे हटणार नाही आणि संयमही बाळगणार नाही. हिंदुस्थानच्या कुठल्याही कोपऱ्यात घुसून लढण्याची आमची क्षमता आणि तयारी आहे,’ अशी धमकी पाकिस्तानी सैन्याने दिली आहे.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांच्या अलीकडच्या वक्तव्यांवर पाकिस्तानी सैन्याने ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘जगाच्या नकाशावर राहायचे असेल तर शेजारी देशाने आमच्या विरोधात दहशतवाद पोसणे बंद करावे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी आम्ही जो संयम दाखवला तसा यापुढे दाखवणार नाही. हिंदुस्थानी सैन्याने त्यासाठी तयार राहावे,’ असे द्विवेदी म्हणाले होते, तर पाकिस्तानची किमान डझनभर लढाऊ विमाने पाडल्याचा दावा एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी केला होता.
हिंदुस्थानी अधिकाऱयांच्या इशाऱयानंतर पाकिस्तान संतापला आहे. पाकिस्तानी लष्कराने निवेदन प्रसिद्ध करून धमकी दिली आहे. ‘हिंदुस्थानातील सुरक्षा दलातील सर्वोच्च अधिकाऱयांनी व्यक्त केलेली मते प्रक्षोभक आणि चिंताजनक आहेत. हिंदुस्थान पुन्हा संघर्षाच्या तयारीत असल्याचे यातून दिसते, पण आम्हीही सज्ज आहोत. पाकिस्तान यापुढे शत्रूला वेगळय़ा पद्धतीने प्रत्युत्तर देणार आहे. ही पद्धत वेगवान, निर्णायक आणि विध्वंसक असेल. शत्रूच्या कुठल्याही प्रदेशात जाऊन लढण्याची आमची क्षमता आहे. नकाशावरून पुसले जाण्याचीच वेळ आली तर तीन दोन्ही बाजूंवर येईल, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.
गमावलेली प्रतिष्ठा मिळवण्याचा मोदींचा प्रयत्न
पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक्सवर पोस्ट करून तीव्र प्रतिक्रिया दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान झालेल्या दारुण पराभवामुळे पंतप्रधान मोदी व त्यांच्या पक्षाने विश्वासार्हता गमावली आहे. हिंदुस्थानी अधिकाऱ्यांची विधाने हा नेतृत्वाची कलंकित प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तान हा अल्लाहच्या नावाने स्थापन झालेला देश आहे. आमचे जवान अल्लाहचे सैनिक आहेत. त्यामुळे भविष्यात युद्ध झालेच तर हिंदुस्थान त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱयाखाली गाडला जाईल, असे आसिफ म्हणाले.
Comments are closed.