पाकिस्तानने धू धू धुतलं, टीम इंडियाचा दारुन पराभव; सेमीफायनलचं सगळं गणित बिघडलं, पॉइंट्स टेबलमध


भारत अ एशिया कप रायझिंग स्टार्स सेमीफायनल पात्रता परिस्थिती: पाकिस्तानने भारतावर 8 विकेटांनी दणदणीत विजय मिळवला आहे. आशिया कप राइजिंग स्टार्स 2025 मधील या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज माज सदाकत याने एकहाती सामना फिरवला. सदाकत याने नाबाद 79 धावा ठोकत भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत फक्त 136 धावांवर ऑलआऊट झाला आणि पाकिस्तानने हे लक्ष्य केवळ 14 व्या षटकात सहज गाठले. या विजयामुळे पाकिस्तान ग्रुप-B मध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला वैभव सूर्यवंशीने तुफानी सुरुवात करून दिली. त्याने 28 चेंडूंमध्ये 45 धावा केल्या. नमन धीरनेही 20 चेंडूंमध्ये 35 धावांची आक्रमक खेळी करत पाकिस्तानी गोलंदाजांचा थोडा समाचार घेतला. मात्र या दोन्ही खेळाडूंना सोडून इतर कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. कर्णधार जितेश शर्मा आणि आशुतोष शर्माही फेल ठरले. परिणामी भारतीय डाव केवळ 136 धावांत आटोपला. पाकिस्तान अ संघाने भारत अ संघाचा 8 विकेटांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

उपांत्य फेरी गाठणारी पाकिस्तान ही पहिलीच टीम (Pakistan reach Asia Cup Rising Stars Semi Final)

दोन्ही गटांमधून उपांत्य फेरी गाठणारी पाकिस्तान ही पहिलीच टीम ठरली आहे. या मोठ्या पराभवामुळे भारत अ संघाच्या नेट रनरेटमध्ये मोठी घसरण झाली असली, तरीही उपांत्य फेरी गाठण्याचा त्याचा मार्ग फार अवघड नाही.

या पराभवानंतर भारत अ संघाचा नेट रनरेट 7.4 वरून थेट 2.245 वर आला. तरीही तो ग्रुप-बीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान अ अव्वल स्थानी असून अद्यापपर्यंत अपराजित आहे. इंडिया अ संघ आणि पाकिस्तान अ यांच्या सामन्यापूर्वी दिवसा ओमान आणि यूएई यांच्यात सामना झाला, ज्यात ओमानने रोमांचक विजय मिळवत उपांत्य फेरीच्या शर्यतीत प्रवेश ठेवला आहे.

ग्रुप बीच्या उपांत्य फेरीतील पात्रतेची समीकरणे (Asia Cup Rising Stars 2025 Team India Qualification Scenario)

पाकिस्तान अ संघाच्या पात्रतेनंतर 18 नोव्हेंबरला होणारा भारत अ विरुद्ध ओमान सामना ‘नॉकआउट’ ठरला आहे. या सामन्यात जी टीम जिंकेल, तीच ग्रुप बीमधील दुसरी उपांत्य फेरीतील टीम बनेल. त्यामुळे भारत  अ संघासाठी उपांत्य फेरी गाठण्याची संधी तुलनेने सोपी मानली जात आहे.

क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटले जाते. जर ओमान उपांत्य फेरीत पोहोचला, तर हे विधान खरे ठरेल. भारत अ संघावर विजय मिळवणे ओमानसाठी मोठी कामगिरी असेल, मात्र त्याची शक्यता कमीच मानली जात आहे.

यूएई उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पाकिस्तान अ विरुद्ध त्याचा शेवटचा लीग सामना आहे. हा सामना जिंकला तरी त्यांचे केवळ दोन गुण होतील, आणि उपांत्य फेरीसाठी चार गुण आवश्यक असल्याने ते पुढे जाऊ शकणार नाहीत.

ग्रुप बी संघाचे उर्वरित सामने

  • 18 नोव्हेंबर – पाकिस्तान ‘अ’ विरुद्ध यूएई
  • 18 नोव्हेंबर – भारत ‘अ’ विरुद्ध ओमान

हे ही वाचा –

IND-A vs PAK-A : वैभव सूर्यवंशी वगळता सगळे फेल,पाकिस्तानचा आशिया कप रायझिंग स्टारमध्ये भारतावर विजय, दिवसभरात दुसरा धक्का

आणखी वाचा

Comments are closed.