ICC T20 World Cup – पाकिस्तानकडून नामिबियाचा 102 धावांनी धुव्वा, सुपर एटमध्ये प्रवेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कोलंबोच्या दमट हवेत पाकिस्तानने ‘करो या मरो’चा मंत्र जणू तबल्यावरच्या ठेक्यासारखा वाजवला आणि नामिबियाचा 102 धावांनी धुव्वा उडवत टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8मध्ये दणक्यात प्रवेश केला. साहिबजादा फरहानच्या 58 चेंडूंतील 100 धावांच्या नाबाद झंझावाताने पाकिस्तानने 3 बाद 199 धावा केल्या तर शादाब खान आणि उस्मान तारीकने नामिबियाचा अवघा डाव 97 धावांत गुंडाळत आपला महाविजय नोंदवला.

प्रथम फलंदाजीला आलेली पाकिस्तानची आघाडीची फलंदाजी काहीशी संथ होती. सईम अयूब नशिबाच्या धाग्यावर झुलत होता. त्याचे झेल सुटले, संधी मिळाल्या. पण तो अपयशी ठरला. मात्र फरहानने सलमान आगाच्या (38) 67 धावांची भर घातली तर शादाब खानसह 81 धावांची अभेद्य भागी करत संघाला 199पर्यंत नेले. फरहानने 58 चेंडूंत 11 चौकार, 4 षटकारांसह शतक पूर्ण केले. त्याची फलंदाजी आज विजेच्या कडकडाटासारखी कडाडली. हे पाकिस्तानसाठी वर्ल्ड कपमधील दुसरेच शतक ठरले.

दुबळ्या नामिबियानेही उत्साहात 200 धावांचा पाठलाग सुरू केला, पण नंतर पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी असे जाळे टाकले की त्यांचे फलंदाज एकामागून एक त्यात अडकत गेले. उस्मान तारीकने चार, शादाबने तीन विकेट घेत गोंधळलेल्या नामिबियाला 17.3 षटकांत 97 धावांतच संपवले. या विजयामुळे गेल्या सामन्यात हरलेल्या पाकिस्तानचे मनोधैर्यही उंचावले. आता सुपर एटमध्ये त्यांची गाठ न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका यांच्याशी पडेल.

Comments are closed.