UAE vs PAK: यूएईचा दारुण पराभव! सुपर-4 मध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने
आशिया कप 2025 मधील आणखी एक रोमांचक सामना पाकिस्तानने आपल्या नावावर केला आहे. कर्णधार सलमान आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाने बुधवारी यूएईवर 41 धावांनी मात करत सुपर-4 फेरीत प्रवेश निश्चित केला. आता सुपर-4 मध्ये पाकिस्तानचा सामना भारताशी 21 सप्टेंबर रोजी दुबईत होणार आहे. याआधीच्या गट सामन्यात भारताने पाकिस्तानला 7 गडी राखून धूळ चारली होती.
यूएईला 147 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानी गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर यूएईचा डाव 17.4 षटकांत 105 धावांवर गडगडला. आलीशान शराफू (21) आणि कर्णधार मुहम्मद वसीम (14) यांनी काही फटकेबाजी केली, पण त्यांना मोठी खेळी खेळता आली नाही. यूएईकडून सर्वाधिक धावा आकाश चोप्राने केल्या. त्याने 35 चेंडूत 30 धावा जोडल्या. ध्रुव पराशरने 20 धावा करून थोडी साथ दिली. पण इतर सहा फलंदाज दहाच्या आतच बाद झाले.
पाकिस्तानकडून शाहीन अफरीदी, हारिस राऊफ आणि अबरार अहम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर सॅम अयूब आणि कर्णधार सलमान आगाने प्रत्येकी एक गडी बाद केला. याशिवाय यूएईचे दोन फलंदाज धावबाद झाले.
याआधी पाकिस्तानने 20 षटकांत 9 गडी गमावून 146 धावा केल्या. सुरुवातीला पाकिस्तानची अवस्था बिकट होती. सॅम अयूब शून्यावर बाद झाला, तर साहिबजादा फरहान (5) लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र फखर जमन (36 चेंडूत 50) आणि सलमान आगा (27 धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
पुढील फलंदाजांकडून विशेष साथ मिळाली नाही. हसन नवाज (3) आणि खुशदिल शाह (5) यांसह सहा खेळाडू दहाच्या आतच बाद झाले. मात्र शेवटच्या टप्प्यात शाहीन अफरीदीने जोरदार फटकेबाजी करत 14 चेंडूत नाबाद 29 धावा ठोकल्या. मोहम्मद हारिसनेही 18 धावा जोडल्या. यूएईकडून जुनैद सिद्दीकीने 4, तर सिमरनजीत सिंगने 3 बळी घेतले.
21 सप्टेंबर रोजी रविवारी सुपर 4 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान 🚨 🚨 🚨 pic.twitter.com/j9tzrfdcxe
– जॉन्स. (@Criccrazyjhons) 17 सप्टेंबर, 2025
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा सामना तासाभर उशिरा सुरू झाला. कारण पाकिस्तान संघ वेळेत हॉटेलमधून मैदानावर पोहोचला नव्हता. त्यामुळे बॉयकॉटच्या चर्चेला उधाण आले. याआधी भारताविरुद्धच्या सामन्यात “नो हँडशेक” वादानंतर पाकिस्तानने आयसीसीकडे सामन्यातील रेफरी अँडी पाइक्रॉफ्ट यांना बदलण्याची मागणी केली होती. मात्र आयसीसीने ती मागणी फेटाळून लावली आणि पाइक्रॉफ्ट यांनीच या सामन्यात रेफरीची जबाबदारी पार पाडली.
Comments are closed.