इच्छा असूनही टी20 वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकू शकत नाही पाकिस्तान! माघार घेतल्यास होणार कंगाल

जागतिक क्रिकेटमध्ये सध्या 2026 चा टी20 वर्ल्ड कप हा सर्वात चर्चेचा विषय ठरत आहे. बांगलादेश आपल्या हट्टामुळे स्पर्धेपूर्वीच बाहेर झाला असून, स्कॉटलंडचे अचानक स्पर्धेत पुनरागमन झाले आहे. मात्र, बांगलादेशला साथ देणारा पाकिस्तान अजूनही आपल्या कुरापतींपासून मागे हटायला तयार नाही.

​बांगलादेश बाहेर पडल्यानंतर आता पाकिस्तानही या महाकुंभातून माघार घेण्याची धमकी देत आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) इच्छा असूनही आता स्पर्धेत खेळण्यास नकार देता येणार नाही; कारण तसे केल्यास पीसीबी केवळ कायदेशीर कचाट्यातच अडकणार नाही, तर पूर्णपणे कंगाल होईल.

​प्रत्येक मोठ्या आयसीसी (ICC) स्पर्धेपूर्वी सर्व पूर्ण सदस्य बोर्ड एका करारावर स्वाक्षरी करतात, ज्याला ‘टूर्नामेंट पार्टिसिपेशन एग्रीमेंट’ (TPA) म्हटले जाते. हा कोणताही साधा कागद नसून, याच्या विरोधात जाणाऱ्या बोर्डाला गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

​आता जर पाकिस्तानने शेवटच्या क्षणी माघार घेतली, तर तो कराराचा भंग मानला जाईल. अशा स्थितीत आयसीसी पाकिस्तानचा वार्षिक महसुलाचा हिस्सा (Revenue Share) रोखू शकते, जो साधारणपणे 34 ते 35 दशलक्ष डॉलर्सच्या घरात असल्याचे सांगितले जाते.

​पाकिस्तानने 2026 टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास, आयसीसी पीसीबीवर निलंबनासारखी कडक कारवाई देखील करू शकते. याशिवाय, भविष्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी स्पर्धांचे यजमानपदही त्यांच्याकडून हिरावून घेतले जाऊ शकते.

​वर्ल्ड कपमधून माघार घेण्याचा फटका पाकिस्तानला त्यांच्या ‘पाकिस्तान सुपर लीग’ (PSL) मध्येही सोसावा लागू शकतो. बीसीसीआय (BCCI) आणि आयसीसीशी पंगा घेतल्यामुळे इतर मोठे क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना पीएसएलमध्ये न खेळण्याचा सल्ला देऊ शकतात. परदेशी खेळाडूंशिवाय पीएसएलचे ब्रँड व्हॅल्यू शून्यावर येईल.

​बीसीसीआय आणि आयसीसीच्या विरोधात जाण्याचा निर्णय पाकिस्तानला खूप महागात पडू शकतो. अनेक क्रिकेट बोर्ड पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका (Bilateral Series) खेळण्यास नकार देऊ शकतात, ज्यामुळे पीसीबीला भविष्यात प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागेल.

Comments are closed.