पाकिस्तानने क्षेपणास्त्र चाचणीचा दावा केला

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव शिगेला पोहचलेला असताना, पाकिस्तानने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा केला आहे. या क्षेपणास्त्राचे नाव ‘अब्दाल्ली’ असे ठेवण्यात आले असून त्याचे अंतर 450 किलोमीटर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शनिवारी ही चाचणी करण्यात आली असा दावा आहे.

आण्विक तसेच पारंपरिक अशा कोणत्याही प्रकारची 500 ते 700 किलो वजनाची स्फोटके वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र असून लक्ष्यावर अचूक मारा करण्याची त्याची क्षमता आहे, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. या क्षेपणास्त्रामुळे भारताच्या आतल्या भागात हल्ले करण्याची क्षमता पाकिस्तानमध्ये निर्माण झाली आहे, असाही दावा होत आहे.

भूमीवरुन भूमीवर मारा

भूमीवरुन भूमीवर मारा करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. भारताकडे अशी अनेक क्षेपणास्त्रे आहेत. भारताच्या ब्राम्होस या क्षेपणास्त्राला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने हे क्षेपणास्त्र तयार केले आहे, असेही पाकिस्तानच्या संरक्षण विभागाचे प्रतिपादन असून या क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानची मारक क्षमता वाढणार असल्याची माहिती पाकिस्ताकडून देण्यात आली आहे.

शांततेसाठी पाकिस्तान तयार

शांततेसाठी आणि भारताशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान तयार आहे, असे प्रतिपादन त्या देशाचे नेते शाहबाज शरीफ यांनी केले आहे. भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये चीन आणि इतर देशांनी मध्यस्थी करावी, असेही साळसूद आवाहन शरीफ यांनी शनिवारी केले. त्यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या राजदूतांशीही या संदर्भात चर्चा केल्याचे वृत्त देण्यात आले आहे.

Comments are closed.