PCBचा धक्कादायक निर्णय! खेळाडूंच्या वेतन शुल्कात 70% कपात

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तानने केले होते. या स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाची कामगिरी खूपच निराशाजनक होती. जेतेपद जिंकणे तर सोडाच, संपूर्ण स्पर्धेत संघ एकही सामना जिंकू शकला नाही. आता चॅम्पियन्स ट्रॉफी संपल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी राष्ट्रीय टी20 कपमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सामन्याच्या शुल्कात कपात केली आहे.
सामना शुल्क 75% ने कमी केले.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आगामी टी20 स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या सामन्याच्या शुल्कात कपात केली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना सामना शुल्क म्हणून 10,000 पाकिस्तानी रुपये दिले जातील. जे गेल्या हंगामापेक्षा 75 टक्के कमी आहे. पूर्वी राष्ट्रीय टी20 सामन्यासाठी खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी 40,000 रुपये मिळत असत. आता ते अचानक कमी करण्यात आले आहे. 2022 नुसार, ही एक मोठी कपात आहे. तेव्हा खेळाडूंना सामना शुल्क म्हणून 60000 पाकिस्तानी रुपये मिळत असत.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सामना शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्यामागे आर्थिक अडचणी नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, PCB ला असे वाटते की, देशांतर्गत क्रिकेटमध्ये वाढलेल्या स्पर्धांमुळे खेळाडूंना मिळणाऱ्या संधी वाढल्या आहेत. राष्ट्रीय टी-20 कप, प्रेसिडेंट्स ट्रॉफी यांसारख्या स्पर्धांमधून खेळाडू सातत्याने कमवत असल्याने, सामना शुल्क कमी झाल्याने त्यांना फारसा फटका बसणार नाही.

राष्ट्रीय टी20 कप 2025 आगामी 14 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेतील सामने फैसलाबाद, लाहोर आणि मुलतान या तीन प्रमुख शहरांमध्ये रंगणार आहेत. 39 सामन्यांची ही स्पर्धा 27 मार्च रोजी फैसलाबाद येथे अंतिम सामन्याने संपन्न होईल.

दरम्यान, पाकिस्तान संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. मार्च महिन्यात त्यांना न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट दोन्ही ठिकाणी पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी व्यस्त वेळापत्रक असणार आहे.

Comments are closed.