पाकिस्तानची सर्वांसमोर नाचक्की, PCB चा आयसीसीवर संताप! 2026 टी20 वर्ल्ड कपमुळे वाद निर्माण

विश्व क्रिकेटमध्ये पाकिस्तानची पुन्हा एकदा जाहीरपणे बदनामी झाली आहे. या कारणामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (ICC) नाराज आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी तिकीट विक्रीच्या प्रसिद्धीसाठी ICC ने जे पोस्टर जारी केले आहे, त्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याचा फोटो नसल्यामुळे PCB ICC वर नाराज आहे.

न्यूज एजन्सी पीटीआयने त्यांच्या रिपोर्टमध्ये PCB मधील एका विश्वसनीय सूत्राच्या हवाल्याने सांगितले आहे की, हा मुद्दा ICC समोर उपस्थित करण्यात आला आहे, कारण प्रसिद्धी पोस्टरवर फक्त पाच कर्णधारांचे फोटो आहेत. या पाच कर्णधारांमध्ये यांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादव (भारत), एडेन मार्करम (दक्षिण आफ्रिका),मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया), दासुन शनाका (श्रीलंका), हॅरी ब्रूक (इंग्लंड)

सूत्राने पुढे सांगितले की, काही महिन्यांपूर्वी आशिया चषकादरम्यानही आम्हाला अशाच समस्येचा सामना करावा लागला होता. त्यावेळी प्रसारकांनी आमच्या कर्णधाराचा फोटो न वापरता प्रचार मोहीम सुरू केली होती. PCB ने आशियाई क्रिकेट परिषदेशी (ACC) चर्चा केल्यानंतरच त्या परिस्थितीत बदल झाला होता, असेही त्यांनी सांगितले.

सूत्राने सांगितले की, यावेळीही आम्हाला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, कारण ICC ने तिकीट विक्रीच्या प्रसिद्धी पोस्टरमध्ये आमच्या कर्णधाराचा फोटो वापरला नाही. ते म्हणाले की, पाकिस्तान ICC टी20 क्रमवारीत टॉप पाच संघांमध्ये समाविष्ट नसला तरी, त्यांचा एक समृद्ध इतिहास आहे आणि विश्वचषकामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेणाऱ्या संघांपैकी तो एक आहे. PCB ला पूर्ण विश्वास आहे की ICC प्रसिद्धी पोस्टर आणि जाहिरात मोहिमांमध्ये पाकिस्तानी कर्णधाराचा समावेश नक्कीच करेल.

Comments are closed.