विमान पाडण्याचा इशारा हारिसला महागात पडला, हिंदुस्थानविरुद्धच्या वादग्रस्त कृतीवर आयसीसीकडून दोन सामन्यांची बंदी

क्रिकेटच्या मैदानावर भावना उफाळतात, पण काही वेळा त्या सीमारेषाही ओलांडतात. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रऊफने भावनेच्या भरात 21 सप्टेंबरला कोलंबो येथे झालेल्या आशिया कप सुपर फोर सामन्यात हिंदुस्थानविरुद्ध गोलंदाजी करताना लढाऊ विमान पाडण्याचा इशारा केला होता. त्या वादग्रस्त कृतीसाठी आयसीसीने रऊफवर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी लादली आहे. त्यामुळे विमान पाडण्याच्या इशाऱ्याने रऊफच्या करिअरचेही लॅण्डिंग झाले आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दोन सामने बाहेर असेल या वादग्रस्त कृतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हारिस रऊफवर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे तो 4 आणि 6 नोव्हेंबर 2025 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.

2022 मध्ये मेलबर्नमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात विराट कोहलीने रऊफच्या सलग दोन चेंडूंवर षटकार ठोकले होते. ती जखम अजूनही ताजी आहे. कोलंबोतील सुपर फोर सामन्यात हिंदुस्थानी प्रेक्षकांनी ‘विराट विराट’ अशी घोषणाबाजी करत रऊफला चिडवले. संतापाच्या भरात रऊफने आकाशाकडे बोट दाखवत ‘विमान पाडण्याचा इशारा’ केला. काही सेकंदांचा तो अभिनय होता, पण परिणाम गंभीर ठरला. सोशल मीडियावर त्या कृतीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आणि त्यानंतर बीसीसीआयने तत्काळ आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती. तसेच पीसीबीनेही सूर्यकुमार यादवची तक्रार केली. अखेर चौकशीनंतर रऊफला दोन सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले, तर सूर्याला दंड ठोठावण्यात आला.

37 दिवसांनंतरही आशिया कपची ट्रॉफी अबूधाबीतच

आशिया कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानी संघाने पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ही भूमिका घेतली गेली. त्यानंतर नक्वी ट्रॉफी घेऊन दुबईतील हॉटेलमध्ये परतले आणि आजही ती ट्रॉफी बीसीसीआयच्या ताब्यात आलेली नाही. आता 37 दिवसांनंतरही ट्रॉफी हिंदुस्थानकडे न आल्याने बीसीसीआय बुधवारी होणाऱ्या आयसीसी बैठकीत हा मुद्दा ठळकपणे मांडणार आहे.

Comments are closed.