भारतीय पदांवर पाकिस्तान गोळीबार

जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन ; लष्कराकडून चोख प्रत्युत्तर

सर्कल संस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानने 20 आणि 21 तारखेच्या मध्यरात्री भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. भारतीय सुरक्षा दलाने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे एक तास गोळीबार सुरू राहिला. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर ही शस्त्रसंधी उल्लंघनाची पहिलीच घटना घडली. गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

शेजारी पाकिस्तान वारंवार युद्धबंदीचे उल्लंघन करतो. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान अशा कृती करणार नाही अशी अपेक्षा होती. तथापि, शनिवारी, कुपवाडा जिह्यातील नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. कोणत्याही चिथावणीशिवाय ही युद्धबंदी तोडण्यात आली. भारतीय सैन्याने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. सौदी अरेबियाशी झालेल्या संरक्षण कराराच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानी सैन्याने हे धाडस केल्यामुळे भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले आणि शत्रूच्या निरीक्षण चौकीचे मोठे नुकसान झाले.

पाकिस्तानी हद्दीतून सायंकाळच्या सुमारास झालेल्या गोळीबारानंतर ही केवळ चिथावणी असल्याचे समजून भारतीय लष्कराच्या सैनिकांनी सुरुवातीला संयम बाळगला. परंतु गोळीबाराची तीव्रता वाढल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर दिले. सुमारे तीन तासांनंतर रात्री 9:30 वाजता पाकिस्तानी सैन्याने पुन्हा भारतीय चौक्यांवर गोळीबार केल्यामुळे भारतीय सैनिकांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. सुमारे तासभर जोरदार संघर्ष सुरू राहिला. पाकिस्तानी सैन्याने गोळीबार थांबवल्यानंतर भारतीय सैनिकांनीही गोळीबार थांबवला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या संघर्षात पाकिस्तानी लष्कराच्या एका निरीक्षण चौकीचे मोठे नुकसान झाले आहे.

सीमेजवळ ड्रोनच्या हालचाली

शनिवारी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोन हालचाली दिसून आल्या. आरएस पुरा सेक्टरमधील जाजोवाल गावाजवळ ड्रोन भारतीय हद्दीत घुसल्याची माहिती मिळताच सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी तातडीने कारवाई करत परिसरात शोधमोहीम सुरू केली होती.

घुसखोरीचा आढावा

उत्तरी लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी शनिवारी उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील (एलओसी) सुरक्षा परिस्थिती आणि घुसखोरीविरोधी ग्रिडचा आढावा घेतला. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये नॉर्दर्न कमांडने  ‘लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा, आर्मी कमांडर एनसी यांनी उत्तर काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती आणि घुसखोरी विरोधी ग्रिडचा आढावा घेतला. त्यांच्या भेटीदरम्यान, त्यांनी लढाऊ सक्षम प्रात्यक्षिक पाहिले आणि समकालीन धोक्यांना तोंड देण्यासाठी विशिष्ट तंत्रांचा अवलंब केल्याबद्दल आणि नाविन्यपूर्ण वापर केल्याबद्दल सर्व रँकचे कौतुक केले’, असे स्पष्ट केले. या भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी सैनिकांच्या सर्जनशीलतेचे प्रदर्शन करणारे एक प्रभावी नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिक देखील पाहिले. त्यांनी सर्व रँकना दृढ राहण्याचे आणि त्याच वचनबद्धतेने सेवा देत राहण्याचे आवाहन केले.

 

Comments are closed.