तेलाच्या भीषण संकटामुळे पाकिस्तानात ‘स्मार्ट लॉकडाऊन’ लागू; लग्नसोहळ्यांवरही बंदी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण युद्धानंतर निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती कमालीची खालावली असून, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहबाज शरीफ सरकारने देशात ‘स्मार्ट लॉकडाऊन’ लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमांनुसार, 4 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर शनिवारी मध्यरात्री 12.01 वाजेपासून ते रविवारी सकाळी 11.59 वाजेपर्यंत संपूर्ण पाकिस्तानात कडक निर्बंध असतील. या काळात सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवली जाणार असून मोटारवे आणि महामार्गावरील वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या लॉकडाऊनच्या काळात नियोजित असलेले सर्व विवाहसोहळेदेखील रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, ज्यामुळे सरकारवर टीकेची झोड उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आधीच महागाई आणि गरिबीने होरपळलेल्या पाकिस्तानला या तेल आणि वायू संकटामुळे दुहेरी फटका बसला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ ही चिंतेची बाब ठरत आहे. यापूर्वी 3 हजार 150 ते 3 हजार 950 रुपयांना मिळणारा 11.67 किलोग्रॅमचा सिलिंडर आता 5, 135 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. इंधनाचे दर गगनाला भिडल्याने रिक्षा, बस आणि मिनीबस यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या भाड्यात मोठी वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय जनतेच्या दैनंदिन खिशावर होत आहे. ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी उचललेले हे पाऊल पाकिस्तानला या संकटातून बाहेर काढणार की परिस्थिती आणखी बिकट करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.