पाकिस्तान अणुचाचण्या करत आहे

डोनाल्ड ट्रंप यांच्या विधानाने जगभरात खळबळ

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पाकिस्तान गुप्तपणे अणुपरिक्षणे करीत आहे, असे खळबळजनक विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केले आहे. अमेरिकेतील एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हा भांडाफोड केल्याने पाकिस्तान उघडा पडला आहे. पाकिस्तानप्रमाणेच रशिया, उत्तर कोरिया आणि चीन हे देशही अणुपरिक्षणे करीत आहेत. त्यामुळे अमेरिकेलाही तसेच करावे लागेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.

अमेरिका नव्या अण्वस्त्रांची परिक्षणे करेल, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी ट्रंप यांनी केली आहे. त्यामुळे अमेरिकेत मोठे वादळ उठले आहे. त्यासंबंधी ट्रंप यांना या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. रशिया, पाकिस्तान, चीन, उत्तर कोरिया आदी देश अण्वस्त्रांच्या चाचण्या करतात. पण ते देश या चाचण्यांची वाच्यता करीत नाहीत. अमेरिका हा एकच देश असा आहे, की जो अणुपरिक्षणे करत नाही. तथापि, आता आम्हालाही स्वस्थ बसता येणार नाही. त्यामुळे आम्ही अशी परिक्षणे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही असे करण्याचा निर्णय घेतला की त्वरित त्याचा बभ्रा होतो. आम्हाला प्रश्न विचारले जातात. अमेरिका हे एक मुक्तसमाजी राष्ट्र असल्याने आमच्यावर अशा निर्णयासंबंधी टीका केली जाते. इतरांसंबंधी मात्र मौन पाळले जाते, असे उत्तर ट्रंप यांनी या प्रश्नाला दिले.

अमेरिकेकडे भरपूर अण्वस्त्रे

अमेरिकेला अण्वस्त्रांची परिक्षणे करुन कोणीही घाबरवू शकत नाही. आमच्याकडे इतकी अण्वस्त्रे आहेत, की त्यांच्यामुळे हे सारे जग 150 वेळा नष्ट करता येईल. तरीही आम्ही आमची सज्जता राखण्यासाठी अण्वस्त्रांची परिक्षणे करण्याचा निर्णय घेतला आहे. आमची अण्वस्त्रे कशाप्रकारे कार्य करत आहेत, याची चाचपणी करण्याची आवश्यकता आहे. रशियाने नुकतीच अणुपरिक्षण करण्याची घोषणा केली आहे. उत्तर कोरिया तर सातत्याने अणुपरिक्षणे करतच असतो. अशा स्थितीत केवळ अमेरिकेनेच अण्वस्त्रांची परिक्षणे करु नयेत, अशी अपेक्षा धरता येणार नाही. आम्हाला अणुपरिक्षणापासून अलिप्त देश म्हणून नाव कमावायचे नाही. आम्हीही इतर अनेक देशांप्रमाणे अणुपरिक्षणे करणार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

चीन संख्या वाढवतोय…

चीनकडेही काही अण्वस्त्रे आहेत. तो देश आपल्या अण्वस्त्रांची संख्या वाढवित आहे. रशियाकडेही अनेक अण्वस्त्रे आहेत. रशियाने नुकतेच अत्याधुनिक आणि प्रगत अण्वस्त्रांचे परिक्षण केलेले आहे. त्यामुळे अमेरिकेनेही त्वरित आपल्या अण्वस्त्रांचे परिक्षण करण्यास प्रारंभ करावा, असा आदेश दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अण्वस्त्रमुक्ती चांगलीच, पण…

मी चीन आणि रशियाशी अण्वस्त्रमुक्तीसंदर्भात चर्चा केली आहे. अण्वस्त्रमुक्तीची संकल्पना उत्तम आहे. पण केवळ अमेरिकेकडून ती ठेवली जाऊ शकत नाही. आम्हालाही जगासमवेत चालावे लागते. अमेरिकेशी केलेला प्लुटोनियमसंबंधीचा करार रशियाने या कराराचा कालावधी संपल्याचे कारण दाखवत संपुष्टात आणला आहे. त्यामुळे आम्ही परिक्षणांसाठी सज्ज आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

भारतासाठीही सुवर्णसंधी…

ट्रंप यांनी या मुलाखतीत पाकिस्तानचा पर्दाफाश केला असून त्यामुळे भारतालाही अण्वस्त्रांचे परिक्षण करण्याची आणि आपला अणुकार्यक्रम अद्ययावत स्थितीत आणण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे, असे काही तज्ञांचे मत आहे. आतापर्यंत अमेरिका आणि इतर देशांच्या दबावामुळे भारताला अणुपरिक्षण 1998 नंतर कधीही करता आलेली नाही. पण आता जर जगात अण्वस्त्रांची स्पर्धा नव्याने होत असेल, तर भारतानेही स्वस्थ बसू नये, असा विचारप्रवाह प्रबळ होत आहे.

ट्रंप यांनी केला पर्दाफाश…

ड डोनाल्ड ट्रंप यांनी उघडपणे केला पाकिस्तानच्या अणुपरिक्षणांचा पर्दाफाश

ड अमेरिकेने अण्वस्त्रांची परिक्षणे करावीत, असा त्यांनी आदेश दिला गुरुवारी

ड या घडामोडींमुळे भारताला मिळणार अण्वस्त्रे अद्ययावत करण्याची मोठी संधी

Comments are closed.