पहलगाम हल्ल्याची किंमत पाकिस्तान अजूनही चुकवत आहे.

एक वर्षानंतरही बगलिहार धरणाचे दरवाजे बंद

वृत्तसंस्था/ जम्मू

जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे सर्व दरवाजे अद्याप पूर्णपणे बंद आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘सिंधू जल करार’ स्थगित केला होता. हा निर्णय घेऊन आता वर्षे लोटल्यावर भारत सरकारच्या भूमिकेत कुठलाच बदल झालेला नाही. पहलगाम हल्ल्यानंतर स्थगित करण्यात आलेला जलवाटप करार आता बाजूला पडला आहे. या ऐतिहासिक कराराच्या अंतर्गतच दोन्ही देशांदरम्यान सिंधू, चिनाब, झेलम इत्यादी नद्यांच्या पाण्याचे वाटप व्हायचे.

धरणांचे दरवाजे सातत्याने बंद राहिल्याने करार स्थगित करण्याच्या निर्णयाचा या क्षेत्रातील जलव्यवस्थापन आणि जलविद्युत संचालनावर किती मोठा प्रभाव पडला हे स्पष्टपणे दिसून येते. चिनाब नदीवरील महत्त्वपूर्ण ‘बगलिहार जलविद्युत प्रकल्प’ दहशतवादी हल्ल्यानंतर घेण्यात आलेल्या या कठोर निर्णयापासून सातत्याने कठोर देखरेखीत आहे.

धरणाचे दरवाजे बंद का?

करार स्थगित केल्यावर भारताने पाकिस्तानच्या दिशेने वाहून जाणारे पाणी रोखणे आणि कूटनीतिक दबाव निर्माण करण्यासाठी चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे सर्व मुख्य दरवाजे बंद पेले होते. या निर्णयाला एक वर्ष झाल्यावरही भारताची भूमिका अद्याप कठोर आहे. सिंधू जल करार अद्याप स्थगित असून बगलिहार धरणाचे दरवाजे अधिकृतपणे बंदच ठेवण्यात आले आहेत.

पावसावेळी पाण्याचा विसर्ग

रामबन आणि आसपासच्या भागांमध्ये अलिकडेच मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. या मुसळधार पावसामुळे चिनाब नदी अचानक धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचू लागली होती. अशास्थितीत धरणाची सुरक्षा आणि अतिरिक्त पाण्याचा दबाव कमी करण्यासाठी व्यवस्थापनाने धरणाचे दरवाजे काही वेळासाठी उघडले होते, जे नंतर बंद करण्यात आले.

सिंधू जल प्रणाली अन् 1960 चा करार

सिंधू जल प्रणालीत मुख्य स्रुपात 6 नद्या सामील आहेत, यात सिंधू, झेलम, चिनाब, रावी, व्यास आणि सतलज यांचा समावेश आहे. या खोऱ्यातील पाण्याचे मुख्यत्वे भारत आणि पाकिस्तानदरम्यान वाटप होते. 1960 मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्या जलवाटपावरुन सिंधू जल करारावर स्वाक्षरी झाली होती. या कराराचे मुख्य मुद्दे अशाप्रकारे आहेत…

पूर्वेकडील नद्या (भारताचा पूर्ण अधिकार) : कराराच्या अंतर्गत तीन पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या रावी, सतलज आणि व्यासचे पूर्ण पाणी भारताला विशेष स्वरुपात वापरण्यासाठी उपलब्ध करण्यात आले होते. या नद्यांमध्ये सरासरी जवळपास 33 दशलक्ष एकर फूट (एमएएफ) पाणी राहते.

पश्चिमेकडील नद्या (पाकिस्तानचा मुख्य अधिकार, भारताचा मर्यादित अधिकार) : पशिमेकडील नद्या सिंधू, झेलम आणि चिनाबचा सरासरी जलप्रवाह जवळपास 135 एमएएफ असून त्याचे पाणी पाकिस्तानला उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु भारताला या नद्यांच्या पाण्याचा घरगुती, कृषी कार्यासाठी मर्यादित वापर करण्याचा अधिकार मिळालेला आहे.

जलविद्युत हक्क

कराराच्या अंतर्गत भारताला पश्चिमेकडील नद्यांवर (सिंधू, झेलम, चिनाब) ‘रन-ऑफ-द-रिव्हर’ प्रकल्पांच्या माध्यमातून जलविद्युत निर्मिती करण्याचा अधिकार प्राप्त आहे. हे प्रकल्प डिझाइन आणि संचालनाच्या विशिष्ट नियम अन् मापदंडांच्या अधीन असतात.

भारताचे प्रमुख जलवापर प्रकल्प

सतलज नदीवरील भाखडा धरण

व्यास नदीवर पोंग अन् पडोंह धरण

रावी नदीवर थीन (रणजीत सागर) धरण

Comments are closed.