पाकिस्तान हे जागतिक दहशतवादाचे केंद्र आहे!

बलुचिस्तान रेल्वे अपहरण प्रकरणी भारताचे वक्तव्य, आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

बलुचिस्तान रेल्वे अपहरण प्रकरणात भारताचा हात असल्याचा पाकिस्तानचा आरोप भारताने फेटाळला आहे. पाकिस्तान हा देश जागतिक दहशतवादाचे केंद्रस्थान आहे, हे या अपहरण घटनेवरुन सिद्ध होत आहे. आपल्या नाकर्तेपणामुळे फोफावलेल्या दशहतवादाचे खापर हा देश भारतावर फोडत असून धादांत खोटे आरोप करीत आहे, असा घणाघात परराष्ट्र विभागाचे सचिव रणधीर जयस्वाल यांनी केला. भारत पाकिस्तानमधील दहशतवादाला खतपाणी घालत आहे, असा आरोप पाकिस्तानने या अपहरण कांडाच्या संदर्भात अप्रत्यक्षरित्या केला आहे.

पाकिस्तानचे आरोप आम्ही पूर्णत: नाकारत आहोत. पाकिस्तानच्या धोरणांमुळेच तेथे दहशतवाद कसा फोफावत आहे, हे साऱ्या जगाला माहीत आहे. पाकिस्तानची अवस्था बिकट आहे. तेथील सरकार सर्व आघाड्यांवर निकामी ठरले आहे. आपले हे अपयश झाकण्यासाठी ते भारतावर खोटेनाटे आरोप करीत आहे. मात्र, असे करून पाकिस्तान जगाला फसवू शकत नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे.

पाकिस्तान मंत्र्याचे आरोप

पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शफाकत अली खान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मंगळवारी घडलेल्या रेल्वे अपहरण प्रकरणाविषयी माहिती दिली. हे संपूर्ण अपहरणकांड अफगाणिस्तानातून नियंत्रित केले जात होते. रेल्वेचे अपहरण करणाऱ्या बंडखोरांना अफगाणिस्तानमधून वेळेवेळी सूचना मिळत होत्या. आपल्या भूमीचा उपयोग पाकिस्तानला त्रास देणाऱ्या दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी करू नका, अशी सूचना आम्ही वारंवार अफगाणिस्तानला केली आहे. तथापि, तो देश आमच्या विरोधात गेला असल्याने आमच्या देशात घडणाऱ्या दहशतवादी संघटनांना त्या देशाचे पाठबळ आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले

भारतावर अप्रत्यक्ष आरोप

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेला भारत गुप्तपणे साहाय्य करीत आहे, असा आरोप पाकिस्तानने नेहमी केला आहे. यावेळी मात्र पाकिस्तान या सर्व प्रकरणाची जबाबदारी अफगाणिस्तानवर ढकलत आहे. पाकिस्तानच्या धोरणात बदल झाला आहे काय, असा प्रश्न खान यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. आमच्या धोरणात कोणतेही परिवर्तन झालेले नाही. भारत पाकिस्तानातील दहशतवादाला प्रोत्साहित आणि प्रेरीत करीत आहे, ही आमची भूमिका कायम आहे, अशा शब्दांमध्ये खान यांनी या अपहरण प्रकरणातही भारताचा हात आहे, असे अप्रत्यक्षरित्या सूचित करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांनी आपल्या आरोपांच्या पुष्ट्यार्थ कोणताही पुरावा या पत्रकार परिषदेत समोर ठेवला नाही.

पाकिस्तानची दुखरी नस

बलुचिस्तान प्रांत हा पाकिस्तानची अनेक दशकांपासूनची दुखरी नस बनला आहे. हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. मात्र, येथील लोकसंख्या कमी आहे. हा खनिज संपत्तीने समृद्ध प्रांत आहे. मात्र, या संपत्तीचा लाभ या प्रांतातील जनतेला मिळत नाही. पाकिस्तान सरकार या संपत्तीचा उपयोग पंजाब प्रांताच्या समृद्धीसाठी करते, असा येथील जनतेचा आरोप आहे. त्यामुळे या प्रांताला पाकिस्तानपासून वेगळे होऊन स्वतंत्र देश म्हणून आपली ओळख बनवायची आहे. त्यामुळे येथे पाकिस्तान विरोधात अनेक संघटना उभ्या राहिल्या आहेत. त्यांच्यापैकी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी ही सर्वात मोठी आणि बळकट संघटना आहे. अलिकडच्या काळात या सर्व बंडखोर संघटनांनी एकत्र येऊन एक संयुक्त फळी उभी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली असून या प्रांताच्या अनेक भागांमध्ये पाकिस्तानचे प्रशासन चालत नाही, अशी स्थिती आहे. हा प्रांत कधीना कधी पाकिस्तानपासून वेगळा होईल, अशी धास्ती पाकिस्तान प्रशासनाला नेहमी वाटते. त्यामुळे सरकारने येथे दमनचक्र चालविले आहे.

Comments are closed.