क्रीडाजगताला हादरवणारी घटना; पाकिस्तानच्या हल्ल्यात 3 तरुण क्रिकेटपटूंचा मृत्यू, राशिद खान आक्रोशात
पाकिस्तानच्या अलीकडील हवाई हल्ल्यांमध्ये तीन अफगाण तरुण क्रिकेटपटूंचा बळी गेल्याने संपूर्ण अफगाणिस्तान क्रीडा विश्वात संतापाची लाट उसळली आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याने या हल्ल्यांवर तीव्र प्रतिक्रिया देताना याला “पूर्णतः अनैतिक आणि क्रूर कृत्य” असे संबोधले. या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचाही मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये कबीर, सिबघतुल्लाह आणि हारून या तीन होतकरू क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) या हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तान सरकारवर “भ्याड आणि क्रूर हल्ला” केल्याचा आरोप केला आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, हे खेळाडू पक्तिका प्रांतातील उरगुन येथून शराना येथे फ्रेंडली क्रिकेट सामन्यासाठी गेले होते. घरी परतल्यानंतर एका स्थानिक सभेत सहभागी होत असताना त्यांना लक्ष्य करण्यात आले.
या घटनेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील तिरंगी मालिकेतून माघार घेतली आहे. 5 ते 29 नोव्हेंबरदरम्यान लाहौर आणि रावळपिंडी येथे ही मालिका खेळवली जाणार होती. आता ही मालिका अनिश्चिततेत सापडली आहे.
राशिद खान याने सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया देत लिहिले की, “या हल्ल्यांमध्ये महिलांसह, मुलं आणि देशासाठी स्वप्न पाहणारे क्रिकेटपटूही मारले गेले. अशा अमानवी कृत्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई झाली पाहिजे.” तसेच, राशिदने एसीबीच्या मालिकेतून माघार घेण्याच्या निर्णयाचं स्वागत करत म्हटले की, “या कठीण प्रसंगी मी माझ्या लोकांसोबत उभा आहे. राष्ट्रीय सन्मान सर्वात महत्त्वाचा आहे.”
पाकिस्तानच्या या हल्ल्यांमुळे अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषेवरील तणाव आणखी वाढला आहे. 48 तासांच्या युद्धविरामानंतरही पाकिस्तानी हवाई हल्ले सुरूच राहिल्याने अर्जुन व बर्मल जिल्ह्यांतील नागरिक भागांना लक्ष्य करण्यात आलं. तालिबान सरकारने याला स्पष्टपणे युद्धविरामाचे उल्लंघन ठरवले असून, सध्या दोहा येथे दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले की, “या तिघा खेळाडूंचा मृत्यू केवळ क्रिकेट जगतातीलच नव्हे, तर अफगाणिस्तानच्या संपूर्ण क्रीडा समुदायासाठी मोठं नुकसान आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांप्रती गहिरं दुःख आणि एकजुटता व्यक्त करतो.”
या घटनेमुळे अफगाणिस्तानने फक्त क्रिकेट मालिकेतून माघार घेतलेली नाही, तर आपल्या शहीद खेळाडूंसाठी राष्ट्रीय आत्मसन्मानाची उभी भूमिका घेतली आहे. क्रीडा क्षेत्रातून आलेल्या या ठाम आणि भावनिक प्रतिकाराने आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले आहे.
Comments are closed.