मोठी बातमी! पाकिस्तानचा ऑलराउंडर ड्रग्ज टेस्टमध्ये पॉझिटिव्ह, पीसीबीने चौकशी केली सुरू

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाज सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या (पीसीबी) चौकशीला सामोरा जात आहे. त्याचे कारण त्याची मनोरंजक (रिक्रिएशनल) अंमली पदार्थांच्या सेवनासाठीची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला श्रीलंकेत झालेल्या टी२० विश्वचषकादरम्यान घेण्यात आलेल्या नियमित तपासणीतून हा अहवाल समोर आला आहे.

नवाजच्या या पॉझिटिव्ह अहवालाचे गंभीर परिणाम तात्काळ दिसू लागले आहे. इंग्लंडच्या टी२० ब्लास्टमध्ये सर संघाकडून खेळण्याचा त्याचा अपेक्षित करार आता रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. इएसपीएल क्रिकइन्फोच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नवाजच्या पॉझिटिव्ह टेस्टबाबत आपल्याला औपचारिकपणे सूचित केल्याचे पीसीबीने स्पष्ट केले आहे. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने बुधवारी (२२ एप्रिल) सांगितले, “आयसीसीने आम्हाला याची माहिती दिली असून मंडळाने आपली कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून त्याचे निकाल लवकरच आयसीसीला कळवले जातील.”

नवाज टी२० विश्वचषक २०२६ मध्ये श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या सातही सामन्याचा भाग राहिला होता. त्यामध्ये त्याने १५ धावा केल्या आणि ७ विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तान त्या स्पर्धेत सुपर-८ मधून बाहेर झाला होता.

नवाज हा पाकिस्तानचा मर्यादित प्रकारामधील एक प्रमुख खेळाडू आहे. त्याने देशाचे ६ कसोटी, ४४ वनडे आणि ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. तो पाकिस्तानकडून टी२० मध्ये चौथा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने १०१ विकेट्स घेतल्या आहेत.

नवाजची चौकशी सुरू असूनही तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे. तो या स्पर्धेत मुलतान सुलतान्सचे प्रतिनिधित्व करतो. नुकतेच कराचीमध्ये खेळल्या गेलेल्या रावळपिंडीजविरुद्धच्या सामन्यात त्याने तीन निर्धाव षटके टाकली. हा सामना मुलताने सहा विकेट्सने जिंकला. चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटचे भविष्य ठरेल. त्याने उत्तेजक द्रव्य विरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचे दोषी आढळताच त्याला निलंबन किंवा पुढील शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

Comments are closed.