पाकिस्तान-व्यापलेला काश्मीर भारतात येईल

युद्ध करण्याचीही नाही आवश्यकता : राजनाथ सिंह यांचा आशावाद

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

पाकव्याप्त काश्मीरचा प्रदेश भारतातचा असून तेथे आता पाकिस्तानच्या अन्याय्य राजवटीच्या विरोधात विरोधाचा सूर बुलंद झाला आहे. या भागातील जनता भारतात येण्यास उत्सुक आहे. तेथे भारतात समाविष्ट होण्याच्या घोषणा घुमू लागल्या आहेत. त्यामुळे हा प्रदेश भविष्यकाळात निश्चितपणे भारतात समाविष्ट होईल. हे होण्यासाठी भारताला पाकिस्तानशी युद्ध करण्याचीही आवश्यकता राहणार नाही, असे महत्वपूर्ण प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. मोरोक्कोमध्ये भारतीय वंशाच्या लोकांसमोर ते बोलत होते.

राजनाथ सिंह सध्या या देशाच्या दौऱ्यावर आहेत. तेथे सोमवारी त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. तेथील भारतीय वंशाच्या नागरीकांनी त्यांच्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात संबोधित करण्ताना त्यांनी हे प्रतिपादन केले. पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेचा आता पाकिस्तानच्या राजवटीच्या विरोधात भ्रमनिरास झाला आहे. तेथील जनतेला भारताची आठवण येत असून आमचा समावेश भारतात करा, अशा मागण्या तेथील महत्वाच्या सर्व संघटना करीत आहेत. त्यामुळे हा प्रदेश निश्चितच भारतात समाविष्ट होईल. तेथील जनतेचा असंतोष पाकिस्तान फार काळ दडपू शकणार नाही, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केला आहे.

दहशतवाद्यांना विरोध

पाकव्याप्त काश्मीरची जनता आता पाकिस्तातून आलेल्या दहशतवादी गटांचा आणि दहशतवादी प्रवृत्तीचा रस्त्यांवर उतरुन निषेध करीत आहे. या प्रदेशातील अनेक खेड्यांमध्ये दहशतवाद्यांना विरोध वाढत आहे. लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याचा मृत्यू झाल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांनी या दहशतवादी संघटनेच्या नेत्यांना त्याच्या अंत्यसंस्कारांमध्ये भाग घेण्यास अनुमती दिली नव्हती. यावरुन, तेथे किती मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांना विरोध होत आहे, हे स्पष्ट होते. पाकिस्तानने या भागाच्या विकासाकडे अनेक दशकांपासून दुर्लक्ष केले आहे. केवळ, या भागातील नैसर्गिक संपत्तीचे शोषण करण्यावर पाकिस्तान प्रशासनाचा भर आहे. त्यामुळे या भागातील जनतेत पाकिस्तानच्या प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे हा भाग पाकिस्तानातून बाहेर पडून भारतात समाविष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

प्रचंड निदर्शने

या वर्षाच्या प्रारंभी पाकव्याप्त काश्मीरच्या रावळकोट या शहरात इस्लामाबादच्या सरकारविरोधात उग्र निदर्शने करण्यात आली होती. सहस्रावधी लोकांनी घराबाहेर पडून पाकिस्तान सरकार विरोधातील आंदोलनात भाग घेतला होता. या भागाच्या पाकिस्तानचे चालविलेल्या शोषणाच्या विरोधात ही निदर्शने होती. राजनाथसिंग यांच्या सोमवारच्या विधानांना या घटनेची महत्वपूर्ण पार्श्वभूमी मिळाली आहे.

Comments are closed.