हिंदुस्थानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास पाकिस्तानचा नकार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानात हॉकी खेळण्यास पुन्हा एकदा पाकिस्तानने नकार दिला आहे. पंजाबमधील जालंधर आणि मोहाली येथे 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पुरुष हॉकी स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतली आहे. तटस्थ ठिकाणी स्पर्धा आयोजित करण्याची मागणी मान्य न झाल्याने पाकिस्तान महासंघाला सरकारकडून स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी मिळाली नाही. पाकिस्तानच्या माघारीनंतर बांगलादेशला स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले आहे.

या स्पर्धेत हिंदुस्थान-पाकिस्तान सामना 1 नोव्हेंबरला जालंधर येथे होणार होता. विशेष म्हणजे पंजाब दिनाच्या दिवशीच हा बहुप्रतीक्षित सामना रंगणार होता. गेल्या महिन्यात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोहालीत स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करताना पाकिस्तानच्या सहभागाची माहिती दिली होती. त्यावेळी हॉकी इंडियाचे महासचिव भोलानाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारीही उपस्थित होते. बांगलादेश आणि ओमान यांना राखीव संघ म्हणून ठेवण्यात आले होते. मात्र वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पाकिस्तान हॉकी महासंघाने हिंदुस्थानात खेळण्यास असमर्थता व्यक्त केली. तसेच आशियाई हॉकी महासंघाकडे स्पर्धा तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची मागणी केली.

2008 नंतर द्विपक्षीय हॉकीला ‘ब्रेक’

मुंबईतील 2008 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय हॉकी मालिका झालेली नाही. पाकिस्तानने अखेरचा हिंदुस्थान दौरा 2023 च्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने केला होता.

Comments are closed.