पाकिस्तान टीमची घोषणा अन् कराची ते लाहोरमध्ये खळबळ! लाडका बाबर आझम संघातून OUT, 6 नवीन चेहरे IN

बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तान संघ : टी-20 वर्ल्ड कपमधील निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. वरिष्ठ खेळाडूंवर कारवाई झाली असून युवा आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने बांगलादेश दौऱ्यासाठी 15 जणांचा एकदिवसीय (ODI) संघ जाहीर केला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांची ODI मालिका 11 ते 15 मार्चदरम्यान खेळवली जाणार असून सर्व सामने ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे होतील. संघाची धुरा पुन्हा एकदा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याच्याकडे सोपवण्यात आली आहे.

6 अनकॅप्ड खेळाडूंना संधी

या संघात 6 अशा खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांना अद्याप एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नाही. त्यामध्ये अब्दुल समद, माज सदाकत, मोहम्मद गाजी घोरी, साद मसूद, साहिबजादा फरहान आणि शमील हुसैन यांचा समावेश आहे.

यापैकी अब्दुल समद, माज सदाकत, साद मसूद आणि शमील हुसैन यांनी अलीकडेच पाकिस्तान शाहीन संघाकडून अबू धाबी येथे इंग्लंड लायन्सविरुद्ध सामने खेळले होते. युवा खेळाडूंवर विश्वास दाखवत संघ व्यवस्थापनाने भविष्यातील बांधणीचा स्पष्ट संदेश दिला आहे.

बाबर, फखर आणि सॅम अयुब बाहेर

सर्वात मोठा धक्का म्हणजे स्टार फलंदाज बाबर आझम, फखर झमान आणि सॅम अयुब यांना ODI संघातून वगळण्यात आले आहे. तसेच वेगवान गोलंदाज नसीम शाहलाही संघात स्थान मिळालेले नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली. संघ सुपर-8 फेरीतच बाद झाला. स्पर्धेत बाबर आजमला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. संथ खेळी आणि दबावाच्या क्षणी धावा करण्यात अपयश आल्याने त्याच्यावर टीका झाली. त्यामुळेच त्याला एकदिवसीय संघातूनही बाहेर ठेवण्यात आल्याचे मानले जात आहे.

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, बाबर आजमने आपली शेवटची ODI मालिका नोव्हेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध रावळपिंडी येथे खेळली होती आणि त्या मालिकेत त्याने नाबाद शतकही झळकावले होते. तरीदेखील PCB ने अलीकडील खराब फॉर्म लक्षात घेऊन हा कठोर निर्णय घेतल्याचे दिसते.

बांगलादेशविरुद्ध ODI मालिकेसाठी पाकिस्तान संघ

शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अशरफ, फैसल अकरम, हारिस रऊफ, हुसैन तलत, माज सदाकत, मोहम्मद रिझवान (यष्टिरक्षक), मोहम्मद वसीम ज्युनियर, मोहम्मद गाजी गोरी (यष्टिरक्षक), साद मसूद, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा आणि शमील हुसैन.

पाकिस्तान vs बांगलादेश ODI मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक

  • ११ मार्च – पहिला वनडे, ढाका
  • १३ मार्च – दुसरी वनडे, ढाका
  • १५ मार्च – तिसरी वनडे, ढाका

हे ही वाचा –

ICC T20 Rankings Update : संजू सॅमसनचं ICC रँकिंगमध्ये वादळ! 25 खेळाडूंना टाकलं मागे; सूर्या मात्र तोंडावर पडला, अभिषेक शर्माचं काय झालं?

आणखी वाचा

Comments are closed.