PSL वर दहशतवादाचे सावट; परदेशी खेळाडूंना थेट धमकी, स्पर्धेतून त्वरित माघार घ्यावी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) 11 व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होत असतानाच, या स्पर्धेवर दहशतवादाचे मोठे सावट पसरले आहे. ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ आणि विशेषतः ‘जमात-उल-अहरार’ या सशस्त्र गटाने एक अधिकृत पत्रक काढून परदेशी खेळाडूंना थेट धमकी दिली आहे. पाकिस्तानमधील सध्याची राजकीय आणि सुरक्षा स्थिती अत्यंत अस्थिर असल्याचे सांगत, परदेशी खेळाडूंनी स्वतःच्या जीवाच्या सुरक्षेसाठी या स्पर्धेतून त्वरित माघार घ्यावी, असा इशारा प्रवक्ता असद मन्सूर याने दिला आहे.

या दहशतवादी गटाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान सारख्या प्रांतांमध्ये जनता लष्करी दडपशाही आणि हिंसाचाराचा सामना करत असताना, पीएसएलसारखा उत्सव साजरा करणे ही लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) देशात शांतता असल्याचे चित्र जगासमोर रंगवण्याचा प्रयत्न करत असले, तरी सध्याचे वातावरण कोणत्याही शांततापूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी योग्य नसल्याचा दावा या गटाने केला आहे. या थेट धमकीमुळे स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला मोठा तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, या तणावपूर्ण वातावरणातच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ सोमवारी मुल्तान सुल्तान्स संघात सामील होण्यासाठी पाकिस्तानात दाखल झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना ‘राष्ट्राध्यक्षांच्या स्तरावरील’ कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आश्वासन दिले असले, तरी या थेट धमकीमुळे खेळाडूंवर मोठा मानसिक दबाव निर्माण झाला आहे. कडेकोट बंदोबस्तात ही स्पर्धा पार पडणार असली, तरी परदेशी खेळाडूंच्या सुरक्षिततेबाबत आता जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.

IPL 2026 – हिंदुस्थानी पाहुणचाराचा गैरफायदा घेऊ नका; आयपीएलमध्ये उशिरा येणाऱ्या परदेशी खेळाडूंवर सुनील गावस्कर संतापले

Comments are closed.