टी20 वर्ल्डकपमधील पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीचा परिणाम, या ‘अंपायरने’ दिला राजीनामा

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक झाली. संघ सुपर-८मधून बाहेर पडल्याने त्यांच्या अनेक दिग्गजांनी संघ व्यवस्थापनावर प्रश्न निर्माण केले. अशा या अत्यंत वाईट कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) खडबडून जागे झाले आहेत. पीसीबीने प्रत्येक खेळाडूवर मोठ्या रकमेची दंडात्मक कारवाई केली होती. आता त्यांच्या बोर्डमध्येच मोठा बदल झाला आहे. एका संघनिवड अधिकाऱ्याने थेट राजीनामा दिला आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीमधील प्रमुख अलीम दार यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी ५०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले होते. ते २०२४मध्ये पाकिस्तान संघाच्या निवड समितीत सहभागी झाले होते. आता त्यांनी टी२० विश्वचषक २०२६ नंतर लगेचच राजीनामा दिला. तसेच पाकिस्तान सलग चौथ्यांदा मोठ्या स्पर्धांच्या उपांत्य फेरीसाठी अपात्र ठरला आहे. त्यामध्ये २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. या स्पर्धेचे यजमानपद त्यांच्याकडेच होते.
दार यांनी राजीनामा दिल्यानंतर निवड समितीत आता केवळ आकिब जावेद आणि असद शफीक आहेत. तसेच डेटा ऍनालिस्ट उस्मान हाश्मी आहेत, मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नाही. यामुळे पीसीबीमध्ये लवकरच बदल दिसतील.
पाकिस्तान या स्पर्धेच्या सुपर-८मध्ये पोहोचला, मात्र त्यांनी त्यांच्या चाहत्यांची निराशा केली. यामधील पाकिस्तानचा शेवटचा सामना श्रीलंकेशी झाला. तो सामना पाकिस्तानने ५ धावांनी जिंकला, मात्र नेट रनरेटमुळे ते स्पर्धेबाहेर झाले. या सामन्यात त्यांनी मोठा विजय मिळवला असता तर ते उपांत्य फेरीत पोहोचले असते.
या स्पर्धेत पाकिस्तानने साखळी फेरीत पहिल्याच सामन्यात नेदरलॅंड्सविरुद्ध विजय मिळवत स्पर्धेला उत्तम सुरूवात केली होती. नंतर यूएसएविरुद्धचा सामना ३२ धावांनी जिंकत सलग दुसरा विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात मात्र भारताकडून ६१ धावांनी पराभूत व्हावे लागले.
शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने नामिबियाविरुद्ध मोठा विजय मिळवला होता. हा सामना पाकिस्तानने १०२ धावांनी जिंकत धमाक्यात सुपर-८मध्ये प्रवेश केला. तेथील पहिलाच सामना जो न्यूझीलंडविरुद्ध होता तो पावसामुळे रद्द झाला आणि इंग्लंडविरुद्धचा दुसरा सुपर-८ सामना गमावला. यामुळे त्यांची स्थिती अधिक वाईट झाली आणि त्यांचे उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले
Comments are closed.