आमचे पाणी रोखल्यास थेट युद्ध पुकारू, पाकिस्तानची हिंदुस्थानला उघड धमकी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘सिंधू जल करार’ स्थगित करून पाकिस्तानची कोंडी केली. त्यामुळे पाकिस्तानात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावरून पाकिस्तानने हिंदुस्थानला युद्धाची पोकळ धमकी दिली आहे. आमचे पाणी रोखले आणि त्यामुळे पाकिस्तानच्या जलसुरक्षेला धोका निर्माण झाल्यास आम्ही हिंदुस्थानविरोधात थेट युद्ध पुकारू, अशी धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी ही धमकी दिली. ते म्हणाले, “आमची राष्ट्रीय सुरक्षा आणि पाण्याचा पुरवठा धोक्यात आला असे ज्यावेळी वाटेल, त्यावेळी आम्ही हिंदुस्थानसोबत युद्ध पुकारू. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत.” हिंदुस्थानने पाणीपुरवठा खंडित केल्याचे पुरावे मिळाले, तर पाकिस्तान युद्धाचा पर्याय निवडेल, असे ख्वाजा आसिफ म्हणाले. हिंदुस्थानचे जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी असे संकेत दिले होते की, २०२८ पर्यंत पाकिस्तानकडे जाणारे सिंधू नदीचे पाणी पूर्णपणे रोखले जाऊ शकते. हिंदुस्थानच्या या पवित्र्यामुळे पाकिस्तानात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.
Comments are closed.