BAN vs PAK: पाकिस्तानकडून पहिल्या पराभवाचा हिशोब चूकता, मालिका बरोबरीत

पाकिस्तान क्रिकेट संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार विजय मिळवत, बांगलादेशविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर, हा सामना पाकिस्तानसाठी करो वा मरो स्वरूपाचा होता. मात्र, संघाने जबरदस्त पुनरागमन करत १२८ धावांनी मोठा विजय नोंदवला. या विजयात मज सदाकतने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत महत्त्वाची भूमिका बजावली.

या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला होता. त्या सामन्यात पाकिस्तानचा डाव अवघ्या ११४ धावांत संपुष्टात आला होता, तर बांगलादेशने ११५ धावांचे लक्ष्य केवळ १५.१ षटकांतच गाठले होते. परिणामी, दुसऱ्या सामन्यात उतरताना पाकिस्तानवर मोठा दबाव होता. मात्र, दुसऱ्या सामन्यात संघाने आपल्या मागील पराभवाचा बदला घेतला.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाकिस्तानकडून डावाची सुरुवात करताना मज सदाकतने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. त्याने ४६ चेंडूंत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७५ धावांची शानदार खेळी साकारली. त्याला सलमान आगाची (६४ धावा) उत्तम साथ लाभली. याव्यतिरिक्त, मोहम्मद रिझवानने ४४ धावांचे आणि साहिबजादा फरहानने ३१ धावांचे योगदान दिले. या फलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर, पाकिस्तानने ४७.३ षटकांत एकूण २७४ धावा उभारल्या.

सामन्यादरम्यान पावसामुळे खेळात व्यत्यय आल्याने, बांगलादेशसमोर ३२ षटकांत २४३ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र, पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत बांगलादेशचा संपूर्ण डाव केवळ २३.३ षटकांत ११४ धावांवर गुंडाळला. मज सदाकतने आपल्या ५ षटकांत केवळ २३ धावा देत ३ महत्त्वपूर्ण बळी मिळवले.

शिवाय, हॅरिस रौफनेही ३ बळी घेत संघाला हा मोठा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने दोन बळी घेतले, तर इतर गोलंदाजांनी प्रत्येकी एक बळी घेत बांगलादेशचा डाव संपुष्टात आणला.

Comments are closed.