पाकिस्तानला योग्य उत्तर मिळेल!
उरीला भेट दिल्यानंतर जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज
वृत्तसंस्था/ श्रीनगर, उरी
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तान आपले नापाक इरादे सोडताना दिसत नाही. जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात सतत गोळीबार सुरू असतानाच जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी उरी सेक्टरला भेट दिली. यावेळी पाकिस्तानी गोळीबारामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतानाच त्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधला. मनोज सिन्हा यांनी लग्मा आणि गिंगल या सीमावर्ती गावांना भेट देत बाधित कुटुंबांशी चर्चा केली. तसेच येथे प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना सिन्हा यांनी पाकिस्तानला योग्य उत्तर मिळेल… असा कडक इशाराही दिला.
नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी परिसरात तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांचीही भेट घेत त्यांचे मनोबल वाढवले. सैनिकांशी बोलत असताना त्यांनी ‘जोश कसा आहे?’ अशी विचारणा करत त्यांची पाठ थोपटली. ‘सैनिकांच्या डोळ्यात दृढनिश्चय दिसतो. मी संपूर्ण देशाला खात्री देऊ इच्छितो की तुम्ही सुरक्षित हातात आहात. संपूर्ण देश सैनिकांच्या शौर्यापासून प्रेरणा घेत आहे. भगवान श्रीराम तुम्हाला शत्रूचा पराभव करण्याची शक्ती देवो. जय हिंद’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
उरीमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ‘भारतीय सशस्त्र दल कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला (पाकिस्तानने केलेल्या ना‘पाक’ प्रयत्नांना) तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. जम्मू काश्मीर प्रशासन येथील लोकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची खात्री करत आहे, असे स्पष्ट केले. सीमावर्ती भागातील ज्या गावांमध्ये नुकसान झाले आहे, तिथे मी गेलो. जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली आहे. नुकसानीचे मूल्यांकन केले जात आहे. येत्या काळात नवीन बंकरची आवश्यकता असल्यामुळे तेदेखील बांधले जातील, असे सिन्हा म्हणाले.
पाकिस्तानने शस्त्र खाली ठेवावीत : मुख्यमंत्री
जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पाकिस्तानने आता शरणागती पत्करावी, अन्यथा त्यांचे नुकसान होईल, असे त्यांनी ठणकावले आहे. आम्ही ही परिस्थिती निर्माण केलेली नाही. पहलगाममध्ये आमच्या लोकांवर हल्ला झाला, निष्पाप लोक मारले गेले. आम्हाला त्याचे उत्तर द्यावे लागले, असेही ते पुढे म्हणाले. पाकिस्तानकडून सामान्य लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जम्मू शहरावर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 1971 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच जम्मूला लक्ष्य करण्यात आले आहे. आमच्या सुरक्षा कर्मच्रायांनी सर्व ड्रोन हाणून पाडले. एकही ड्रोन लक्ष्यापर्यंत पोहोचला नाही. काश्मीरमध्येही लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी यावेळी सांगितले.
Comments are closed.