लिंबूटिंबू संघाला हरवून पाकिस्तानी संघाने जिंकली ट्रॉफी! टीम इंडिया मात्र तळाशी
पाकिस्तानने हाँगकाँगचा षटकार जिंकला 2025 : हाँगकाँग इंटरनॅशनल सिक्सेस 2025 स्पर्धेचं विजेतेपद पाकिस्तानने आपल्या नावावर केलं. अंतिम सामन्यात पाकिस्तानने कुवेतचा एकतर्फी पराभव करत सहाव्यांदा विजेतेपद नाव कोरले. विशेष म्हणजे, कुवेतने यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेतला होता आणि थेट अंतिम फेरीपर्यंत मजल मारत सर्वांना आश्चर्यचकित केलं. पाकिस्तानने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर केवळ एका धावेनं विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला होता, तर कुवेतने इंग्लंडचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.
पाकिस्तानची तुफानी फलंदाजी
अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत केवळ 6 षटकांत 3 गडी गमावून तब्बल 135 धावा केल्या. सलामीवीर अब्दुल समद यानं फक्त 13 चेंडूत 42 धावा करत जबरदस्त सुरुवात दिली, त्यात 2 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याच्या साथीला ख्वाजा नफे यानं 6 चेंडूत 22 धावा केल्या. नंतर कर्णधार अब्बास आफ्रिदी यानं केवळ 11 चेंडूत 52 धावांची झंझावाती खेळी खेळली. कुवेतकडून मीत भावसार हा एकमेव यशस्वी गोलंदाज ठरला, त्यानं 3 विकेट्स घेतल्या.
पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर कुवेतची हाराकिरी
136 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कुवेतनं दमदार सुरुवात केली, पण ती टिकवू शकली नाही. सलामीवीर अदनान इदरीस यानं 8 चेंडूत 30 धावा ठोकल्या, तर मीत भावसार यानं 12 चेंडूत 33 धावा केल्या. पण त्यानंतर कुवेतचा डाव कोसळला आणि संपूर्ण संघ 5.1 षटकांत फक्त 92 धावांत ऑलआऊट झाला. पाकिस्तानचा माज सदाकत हा विजयाचा नायक ठरला, त्यानं 2 षटकांत 29 धावा देत 3 विकेट्स घेतल्या आणि सामन्याचं पारडं पाकिस्तानकडे वळवलं.
पहिला सामना हारला, पण शेवटी ऐतिहासिक विजय
लक्षात घेण्यासारखं म्हणजे पाकिस्तानच्या या स्पर्धेतील सुरुवात फारशी चांगली नव्हती झाली, पहिल्याच सामन्यात त्यांना भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन करत अखेरपर्यंत एकही सामना न गमावता विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. या विजयासह पाकिस्तान हाँगकाँग सिक्सेस सहा वेळा जिंकणारा पहिला देश ठरला आहे. त्यापाठोपाठ इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी पाच-पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
हाँगकाँग सिक्सेस 2025 मध्ये भारताची कामगिरी
हाँगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धा भारतीय संघासाठी एका भयानक स्वप्नासारखी ठरली. पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना जिंकूनही संघ पुढील चार सामने हरला. कुवेत, यूएई, नेपाळ आणि आता श्रीलंकेने भारताचा पराभव केला. ज्यामुळे भारत पॉइंट टेबलमध्ये तळाशी राहीला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.