आरजेडी रॅली येथे 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा
बिहारमधील धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल
वृत्तसंस्था/ लखीसराय
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेमुळे पूर्ण देश दु:खी आहे. या हल्ल्यावरून देशाच्या विविध हिस्स्यांमध्ये निदर्शने केली जात आहेत. पहलगाम येथील हल्ल्याच्या विरोधात बिहारच्या लखीसराय येथे लालूप्रसाद यादव यांच्या राजदने कँडल मार्च आयोजित केला होता. या कँडल मार्चमध्ये राजद कार्यकर्त्यांकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.
पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्याची घटना दर्शविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अतिउत्साहात राजद कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्याचा दावा राजद जिल्हाध्यक्ष कालीचरण दा यांनी केला आहे. सूर्यगढा येथे राजदने कँडल मार्च काढला होता. यादरम्यान जिल्हाध्यक्षांसह अनेक नेते आणि कार्यकर्ते यात सामील झाले होते.
सूर्यगढा येथे आयोजित राजदच्या कँडल मार्चमध्ये भाकपही सामील झाला होता. यात कथित स्वरुपात भाकप नेते कैलास प्रसाद सिंह उर्फ इंजिनियर यांनी पाकिस्तान जिंदाबाद असा नारा दिला. त्यांच्यासोबत राजदच्या नेत्यांनीही पाकिस्तान जिंदाबाद असा नारा दिल्याचे व्हिडिओत दिसून येते.
चौकशीचा आदेश
हा व्हिडिओ मी पाहिला आहे. या प्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद केला जाणार असल्याचे लखीसरायचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी सांगितले आहे. तर हा व्हिडिओ समोर आल्याने राजदची चांगलीच कोंडी झाली आहे. बिहारमध्ये काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याने या घटनेमुळे राजदच्या प्रतिमेला धक्का बसल्याचे मानले जातेय.
Comments are closed.