भारतीय हद्दीत पाकिस्तानी फुगे
जम्मू काश्मीरमध्ये दोन घटना उघड : सुरक्षा यंत्रणा सतर्क
वृत्तसंस्था/ श्रीनगर
उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील दोन वेगवेगळ्या भागांतून पाकिस्तानी ध्वज असलेले फुगे जप्त करण्यात आले. यानंतर बारामुल्ला आणि कुपवाडा जिह्यांमध्ये दक्षता वाढवण्यात आली आहे. पहिल्या घटनेत बारामुल्ला जिह्यातील खाडीनियार भागातील सरना टॉपजवळ सुमारे 10 फुग्यांना बांधलेला पाकिस्तानी ध्वज खाली पडताना दिसला. लष्कराच्या 46 व्या राष्ट्रीय रायफल्सच्या गस्ती पथकाने हे बलुन्स जप्त केले आहेत. दुसऱ्या घटनेत, कुपवाडा जिह्यातील हंदवाराच्या नौगाम परिसरात एका झाडावर ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स’ (पीआयए) असे लिहिलेला एक फुगा आढळून आला. स्थानिकांनी सुरक्षा दलांना याची माहिती दिल्यानंतर लष्कराने ते फुगे जप्त केले. दोन्ही घटना नियंत्रण रेषेजवळ घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. हे फुगे वाऱ्यामुळे उडून आले असावेत, असा संशय आहे. याबाबत सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. प्रशासनाने सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू दिसल्यास तात्काळ सुरक्षा पथकाला कळवण्याचे आवाहनही केले आहे. तसेच संशयास्पद वस्तूंपासून दूर राहावे आणि त्यांना स्पर्श करू नये, असेही बजावले आहे.
Comments are closed.