बांगलादेशातील पाकिस्तानची भारतविरोधी योजना
जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांना भेटले पाक विदेशमंत्री
वृत्तसंस्था/ ढाका
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि विदेशमंत्री इशाक डार हे दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त बांगलादेशची राजधानी ढाका येथे पोहोचले आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी भारतविरोधी कट्टरवादी संघटना जमात-ए-इस्लामीच्या नेत्यांची भेट घेतली. बांगलादेशातील सर्वात मोठा धार्मिक राजकीय पक्ष जमात-ए-इस्लामीला पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे समर्थनप्राप्त आहे. डार यांनी या पक्षाच्या नेत्यांशी ढाका येथील पाकिस्तानी दूतावासात चर्चा केली आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान दरम्यान काही मुद्दे अद्याप सुटलेले नाहीत, हे मुद्दे दोन्ही देशांच्या सरकारांनी निकालात काढायचे आहेत. दोन्ही देश परस्पर हिताच्या दृष्टीकोनातून क्षेत्रीय व्यापार आणि द्विपक्षीय संबंधांना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे उद्गार बांगलादेश जमात-ए-इस्लामीचे नेते अब्दुल्ला मोहम्मद ताहिर यांनी काढले आहेत.
बांगलादेशात शरिया कायद्याची मागणी करणाऱ्या जमात-ए-इस्लामीने पाकिस्तानसोबत संबंध दृढ करण्यावर जोर दिला आहे. बंधुभाव असलेल्या मुस्लिम राष्ट्रासोबत संबंध कसे वृद्धींगत करता येतील यावर चर्चा करण्यात आल्याचे ताहिर यांनी सांगितले. 1971 मधील मुद्द्यांवर दोन्ही देशांकडून चर्चा केली जाऊ शकते असे म्हणत ताहिर यांनी वादग्रस्त मुद्द्यांवर अधिक बोलणे टाळले आहे.
बांगलादेशात जमात-ए-इस्लामीला पाकिस्तान पुरस्कृत राजकीय पक्ष म्हणून ओळखले जाते. या पक्षाने बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्याला विरोध केला होता आणि हा पक्ष पाकिस्तानच्या बाजूने लढत होता. जमात-ए-इस्लामीने पाकिस्तानी सैन्यासोबत मिळून बंगाली भाषिकांच्या नरसंहारात मोठी भूमिका बजावली होती. याच्या नेत्यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली होती. मागील वर्षी हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या कार्यकाळात जमात-ए-इस्लामीच्या अनेक नेत्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली होती. युनूस यांचे सरकार जमात-ए-इस्लामी यासारख्या कट्टरवादी संघटनाच चालवित असल्याचे बोलले जाते.
Comments are closed.