पाकिस्तानने भारतीय विमानांना ठार मारण्याचे दावे निराधार आहेत
हवाई दल प्रमुखांचे पुन्हा स्पष्टीकरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय विमान पाडल्याचे पाकिस्तानचे दावे केवळ निरर्थक असल्याचे भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. पाकिस्तानकडे पुरावे असतील तर त्यांनी ते दाखवावेत. भारताने मात्र शत्रूराष्ट्राचे लढाऊ विमान पाडली असून त्यात एफ-16 आणि जे-17 यांचा समावेश असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.
भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या आत 300 किलोमीटर आत घुसून हल्ला केला. पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही त्यांना अद्दल घडविण्याच्या दृष्टेने सुरक्षा दलाला सरकारकडून मोकळीक देण्यात आली होती. त्यानंतर आम्ही अचूकतेने हल्ला केला. नंतर पाकिस्तानने स्वत: युद्धबंदी मान्य केली, असेही हवाई दल प्रमुखांनी स्पष्ट पेले. हवाई दल प्रमुखांनी पाकिस्तानचे नुकसान उघड करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, 9 ऑगस्ट रोजी त्यांनी पाकिस्तानी लढाऊ विमान पाडण्यात आल्याचे सांगितले होते.
पाकिस्तानच्या दाव्यांवर आम्ही का चर्चा करावी?
जर त्यांना वाटत असेल की त्यांनी आमची 15 (भारतीय) विमाने पाडली, तर त्यांना त्याबद्दल विचार करू द्या. आम्ही त्यावर चर्चा का करावी? आजही, मी काय घडले, किती नुकसान झाले किंवा ते कसे घडले याबद्दल काहीही बोलणार नाही, कारण त्यांना ते शोधून काढू द्या. आमच्या कोणत्याही हवाई तळांवर मात्र काहीही नुकसान झाल्याचे आम्हाला आढळून आलेले नाही, असे हवाई दल प्रमुखांनी सांगितले. आम्ही त्यांना त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणांचे अनेक फोटो दाखवले. पण ते आम्हाला एकही फोटो दाखवू शकले नाहीत. या त्यांच्या ‘चित्रकथा’ आहेत. त्यांना आनंदी राहू द्या; शेवटी, त्यांनाही त्यांचा सन्मान वाचवण्यासाठी त्यांच्या लोकांना काहीतरी दाखवावे लागेल. आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही, असेही ते पुढे म्हणाले.
पाकिस्तानकडून आता नवीन तळांची उभारणी
पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे दहशतवाद्यांकडून नवीन तळ उभारले जात असल्याचा वृत्ताला हवाई दल प्रमुखांनी दुजोरा दिला. आम्हाला असेही अहवाल मिळत आहेत की ते मोठ्या इमारतींऐवजी लहान इमारती बांधत आहेत. परंतु आम्ही अजूनही दहशतवाद्यांना आणि त्यांच्या तळांना टार्गेट करू शकतो. आमचे पर्याय बदललेले नाहीत, असेही त्यांनी सुचित केले.
‘लक्ष्य गाठले, युद्ध संपवले’
भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये एक ठराविक लक्ष्य निर्धारित केले होते. पाकिस्तान आणि भारत यांच्यात झालेला हा संघर्ष हा सर्वांसाठीच एक धडा आहे. एक धडा इतिहासात कायम राहील. हे एक युद्ध होते जे एका ध्येयाने सुरू झाले होते आणि ते वाढल्याशिवाय लवकर संपले. आज जगात काय घडत आहे ते आपण पाहतो. रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यात चालू असलेली दोन युद्धे संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. परंतु आम्ही आमचा लढा इतक्या टप्प्यावर वाढवला की शत्रूने युद्धबंदीची मागणी केली. मला वाटते की जगाने आपल्याकडून हे शिकण्याची गरज आहे, असे हवाई दल प्रमुखांनी अभिमानाने सांगितले.
Comments are closed.