मी मागच्या दाराने लाच घेईन! पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे धक्कादायक विधान

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी धक्कादायक विधान करत अमेरिकन नेत्यांवर इस्रायलकडून उघडपणे लाच घेण्याचा आरोप केला. आसिफ म्हणाले, ‘‘मला लाच घ्यायची असेल तर मी बंद खोलीत घेईन, पण अमेरिकन नेते दिवसाढवळ्या लाच घेतात.’’

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ हे त्यांच्या वादग्रस्त आणि अनेकदा अजब विधानांसाठी ओळखले जातात. नुकतेच त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत वादग्रस्त विधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ख्वाजा आसिफ म्हणाले, ‘‘आम्हाला सतत लाचखोरीच्या आरोपांनी बदनाम केले जाते, पण अमेरिकन राजकारणी उघडपणे इस्रायलकडून पैसे घेतात. जर मला लाच घ्यायची वेळ आली, तर मी मागच्या खोलीत घेईन, पण ते दिवसाढवळ्या पैसे उकळतात.’’ त्यांच्या या विधानावर स्टुडिओतील अँकरही हसू आवरू शकले नाहीत. अँकरने स्पष्टपणे सांगितले की, ‘‘हे विधान निश्चितच व्हायरल होईल.’’ त्यावर आसिफ यांनी सहजपणे उत्तर दिले, ‘‘होऊ दे मग व्हायरल.’’

पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी लावलेल्या लाचखोरीच्या आरोपांवर ख्जाजा आसिफ बोलत होते. विशेष करून इमरान खान यांच्या पीटीआयने सरकारवर विदेशी शक्तींकडून फंडींग घेतल्याचा आरोप केला आहे. ख्वाजा आसिफ यांनी या आरोपांचे खंडन करत अमेरिकेचे उदाहरण दिले. त्यांच्या मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. हा तर कबुलीनामा आहे किंवा कटू सत्य आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानातून उमटत आहे.

Comments are closed.