WCL 2025: पाकिस्तानचं नाव ठरलं वादग्रस्त! भारताच्या नकारामुळे आफ्रिदीला मोठा धक्का
भारत आणि पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये दोन सामने होणार होते. मात्र, भारताने आधी ग्रुप स्टेजमधील सामना आणि त्यानंतर उपांत्य फेरीतील सामनाही पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला. भारताच्या या नकारानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची चांगलीच बेइज्जती झाली असून या संघाची प्रतिमा देखील खराब झाली आहे.
टेलिकॉम आशिया स्पोर्टला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या संपूर्ण जगभरात ही चर्चा सुरू आहे की भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास इच्छुक नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि आदेश दिला आहे की खासगी क्रिकेट लीगमध्ये पाकिस्तानच्या नावाचा वापर केला जाणार नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवार (31 जुलै) रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पीसीबीने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे की, डब्ल्युसीएल मध्ये भारताने दोन वेळा पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट संघाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात घटली आहे. याच कारणामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कोणत्याही खासगी लीगसाठी कोणत्याही खाजगी संस्थेला संघाच्या नावात “पाकिस्तान” हे नाव वापरण्यास मनाई केली आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये भारताने युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरुद्ध ग्रुप स्टेजमधील सामना खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर डब्ल्युसीएलच्या उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले, मात्र या सामन्यातही टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंनी पाकिस्तानसोबत खेळण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आणि भारत स्पर्धेतून आपोआप बाहेर पडला.
Comments are closed.