पाकिस्तानची पाण्याची कमतरता वाढत आहे

झेलम आणि चिनाबचे पाणी भारताने अडविल्याचा परिणाम, उपग्रहीय छायाचित्रांमधून स्थिती स्पष्ट

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिलला क्रूर हल्ला करून 26 भारतीयांचे प्राण घेतल्यानंतर भारताने विविध मार्गांनी पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. हा हल्ला झाल्यानंतर त्वरित भारताने 1960 चा सिंधू जलवितरण करार स्थगित केला. त्यानंतर त्वरित जम्मू-काश्मीरमधून पाकिस्तानात जाणाऱ्या झेलम आणि चिनाब या नद्यांचे पाणी अडविण्याचा निर्णय घेण्यात आला, आता या निर्णयाचे परिणाम स्पष्ट होत आहेत. या नद्यांवर भारताची सध्या तीन धरणे आहेत. आणखी तीन धरणे बांधण्याची योजना वेगाने साकारत आहे.

सध्या असलेल्या धरणांमधील गाळ काढण्याची प्रक्रिया होत आहे. यासाठी या धरणांमध्ये आधी पूर्ण पाणी भरले जाते. त्यासाठी धरणांचे दरवाजे पूर्ण बंद केले जातात. नंतर एकदम सर्व दरवाजे उघडून पाणी सोडले जाते. पाण्याच्या दबावामुळे गाळ धरणातून बाहेर जातो. चिनाब नदीवरील भारताचे शेवटचे धरण बागलीहार येथे आहे. या धरणातून पाण्याचा विसर्ग पाकिस्तानच्या मरेला धरणात केला जातो. आता भारताने बागलीहार धरणातून सातत्याने विसर्ग करण्याचे थांबविले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या मरेला धरणातील पाणीसाठा कमी झाल्याचे छायाचित्रांवरुन स्पष्ट होत आहे. भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तानच्या काही भागात काहीवेळा पाणीटंचाई, तर काहीवेळा अचानक पूरस्थिती अशी परस्परविरोधी स्थिती निर्माण होताना दिसून येते.

झेलमची परिस्थिती काय आहे…

झेलम नदीवर पाकिस्तानने मंगला धरण बांधले आहे. या धरणातील पाणीसाठ्यात फार मोठी घट दिसून आलेली नाही. मात्र, भारताने या नदीतून अचानक पाणी सोडल्यास या धरणात पाणीसाठा प्रमाणाबाहेर वाढतो असेही दिसून आले आहे. अशा असमतोल पाणीस्थितीमुळे पाकिस्तानला फटका बसत असल्याचेही या छायाचित्रांवरुन दिसून येत आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या उपग्रहांमधून पाठविलेल्या छायाचित्रांमधून ही स्थिती स्पष्ट दिसून येते. भारताने झेलम नदीच्या एका उपनदीवरही किशनगंगा धरण बांधले आहे. या धरणाचा उपयोग भारताने आता कौशल्याने चालविल्याने पाकिस्तानमध्ये पाण्याचा असमतोल निर्माण झाल्याचे या छायाचित्रांवरुन दिसून येते. त्यामुळे पाकिस्तान तक्रार करीत आहे.

गाळ सोडल्यामुळे…

भारताने आता झेलम आणि चिनाब नद्यांवरील तीन्ही धरणांमधला गाळ पुढे ढकलण्याची प्रक्रिया चालविली आहे. यामुळे हा गाळ पुढे पाकिस्तानात जातो आणि तेथील कालवे या गाळामुळे बंद पडतात. त्यामुळे शेतीला पाणी पुरविण्यात अडचणी येतात. शिवाय यात भारताचा लाभ असा की, धरणांमधील गाळ काढला गेल्याने धरणांची पाणीसाठा करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात भारताकडून पाकिस्तानचे अधिकाधिक पाणी अडविले जाऊ शकते.

भारताच्या भविष्यकालीन योजना

भारताने आता या नद्यांचे जास्तीत जास्त पाणी भारतातच उपयोगात आणण्याच्या योजनांवर काम चालविले आहे. आणखी धरणे आणि कालवे बांधले जाणार आहेत. ही दीर्घकालीन प्रक्रिया असली तरी ती अत्यंत प्रभावी ठरु शकते. भारताच्या तीन योजना आहेत. झेलम नदीवरील तुलबुल प्रकल्प पुनरुज्जीवीत करणे, वुलर सरोवराची पाणीसाठा क्षमता वाढविणे, जम्मू क्षेत्रातील रणबीर आणि प्रताप हे कालवे रुंद करुन त्यातून भारतातच अधिक पाणी सोडणे, अशा तीन योजनांवर आधी काम केले जात आहे. ते वेगाने पूर्ण केले तर त्यासाठी दोन ते तीन वर्षे पुरेशी आहेत. त्यानंतर अधिक मोठ्या योजना हाती घेण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, अशी माहिती विविध सूत्रांकडून दिली गेली आहे.

पाकिस्तानकडून मनधरणी

भारताने सिंधू जलवितरण कराराला दिलेल्या स्थगितीचा पुनर्विचार करावा, अशी मनधरणी पाकिस्तानने एका पत्राद्वारे केली आहे. तसेच यासंबंधात भारताशी चर्चा करण्याची इच्छा प्रगट केली आहे. तथापि, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवित नाही, तो पर्यंत त्या देशाशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही, असे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले आहे.

भारताच्या योजनांमुळे कोंडी

  • झेलम आणि चिनाब नद्यांवरील धरणांमधील गाळ काढण्याचे काम वेगात
  • भारतील गाळ पाकिस्तानात ढकलल्याने तेथे पाणीपुरवठ्यात मोठे अडथळे
  • आणखी तीन जलसिंचन योजनांवर भारताचे काम लवकर पूर्ण होणे शक्य
  • भारताने अधिक प्रमाणात पाणी अडविल्यास पाकिस्ताची होणार मोठी कोंडी

Comments are closed.