पलाश मुच्छलनं स्मृती मंधानाला दिला प्रेमाचा ‘गोल्डन मोमेंट’; फिल्मी अंदाजात गुडघ्यावर बसून केलं प्रपोज, VIDEO VIRAL!
टीम इंडियाची स्टार ओपनर स्मृती मंधाना आणि संगीतकार तसेच फिल्ममेकर पलाश मुच्छल यांचा विवाह आता काही दिवसांवर आला आहे. दोघांनी काही दिवसांपूर्वीच साखरपुडा उरकला असून, स्मृतीने इन्स्टाग्रामवरून केलेल्या अनाउन्समेंटला मोठी चर्चा मिळाली होती. त्यानंतर आता पलाश मुच्छलनेही एक खास व्हिडिओ शेअर करत चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने स्मृतीला क्रिकेटच्या मैदानावर फिल्मी शैलीत प्रपोज केल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर पलाशनं स्मृतीसाठी खास सरप्राईजची तयारी केली होती. व्हिडिओच्या सुरुवातीला दोघे स्टेडियममध्ये प्रवेश करताना दिसतात, मात्र स्मृतीचे डोळे बांधलेले असून पलाश तिचा हात धरून तिला पिचकडे घेऊन येतो आणि जसेच स्मृती पट्टी काढते, तसंच समोर पलाश गुडघ्यावर बसून लाल गुलाबांचा गुच्छ देत तिला प्रपोज करताना दिसतो. त्याच क्षणी तो तिच्या हातात अंगठीही घालतो. या अचानक दिलेल्या रोमँटिक सरप्राईजने स्मृती भावूक झाली असून त्या क्षणी पलाशही काहीसा इमोशनल झाल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांचा लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे.
दरम्यान, टीम इंडियाची ही दिग्गज क्रिकेटपटू स्मृती मंधाना 23 नोव्हेंबर रोजी पलाश मुच्छलशी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नाच्या तयारीला दोन्ही कुटुंबांत वेग आला असून, चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. संगीत क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेला पलाश मुच्छल 22 मे 1995 रोजी इंदूर येथे जन्मलेला. मारवाडी कुटुंबात वाढलेला पलाश लहानपणापासूनच संगीताच्या वातावरणात वाढला. त्याची बहीण पलक मुच्छल बॉलिवूडची नामांकित पार्श्वगायिका आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेल्या पलाशने तरुण वयातच संगीत रचनाकडे वळत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.
Comments are closed.