भाजपच्या व्यासपीठावर तुमचे काम काय? शिंदे गटाचे आमदार गावीतांना रजपूतांनी सुनावले, पालघरच्या क्रीडा मैदानावर महायुतीत ‘कुस्ती’
पालघरच्या क्रीडा मैदानावर भाजप व शिंदे गटात चांगलीच राजकीय कुस्ती रंगली. खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यक्रमात शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावीत यांच्या उपस्थितीवरून भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी हे व्यासपीठ असे खडेबोल सुनावत गावीत यांना शेकडो खेळाडू आणि प्रेक्षकांसमोरच ‘जागा’ दाखवली. यावरून संतप्त झालेल्या गावीत यांनीही रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात आमच्या कार्यकर्त्यांना अडकवण्यात रजपूत यांचा हात असल्याचा आरोप केला. त्यावरून काही काळ दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
आमच्या पक्षाचे आहे.. येथे तुमचे काम काय?
१९ नोव्हेंबरपासून पालघरमध्ये खासदार क्रीडा महोत्सव सुरू आहे. यासाठी ४७ हजारांहून अधिक खेळाडू या क्रीडा महोत्सवात सहभागी झाले आहेत. रविवारी याच कार्यक्रमाला आमदार गावीत यांनी हजेरी लावली. त्यावरून भाजपचे भरत राजपूत यांनी त्यांना खडेबोल सुनावले. हा भाजपचा कार्यक्रम आहे, तुम्ही इथे कसे आलात? इतकेच नाही तर रजपूत यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचाही आरोप गावीत यांनी केला आहे. दरम्यान पालकमंत्री गणेश नाईक यांनी मध्यस्थी केल्याने या दोन नेत्यांमधील वादावर पडदा पडला.
कार्यकर्त्यांना अडकवण्यात भाजपचा हात
रजपूत यांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर गावीत यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात आमच्या कार्यकर्त्यांना अडकवण्यात रजपूत यांचा हात आहे. त्यांनीच एफआयआर दाखल करण्यासाठी डॉक्टरांवर दबाव टाकल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला आपण स्वतःहून आलो नव्हतो तर आपल्याला खासदार डॉ. हेमंत सवरा व पालकमंत्री गणेश नाईक यांनी आमंत्रित केल्याचेही सांगितले.
Comments are closed.