वाढदिवसाच्या पार्टीनंतर 11 जणांची प्रकृती बिघडली, केकमध्ये मृत पाल आढळल्याचा दावा
वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर 10 ते 11 जणांची प्रकृती बिघडल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली. सर्वांना उपचारासाठी नालासोपारा येथील विजयलक्ष्मी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केकमध्ये मृत आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील नीलकंठेश्वर इमारतीत एका मुलीचा वाढदिवस होता. यानिमित्त इमारतीसमोरील चामुंडा डेअरी येथील केक शॉपमधून खरेदी करण्यात आला होता. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान उपस्थितांनी केक खाण्यास सुरुवात केली. मात्र, केक खात असतानाच त्यामध्ये मृत पाल आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
केकमध्ये पाल दिसताच उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर केक खाल्लेल्या काही जणांना अस्वस्थ वाटू लागल्याचे सांगण्यात येत आहे. एकूण 10 ते 11 जणांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने विजयलक्ष्मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उर्मिला वर्मा (32), सलोनी गुप्ता (16), सुदीक्षा शाह (19), आफिया इद्रिस (24), रुबी शाह (40), शिव गुप्ता (10), प्रियांश वर्मा (2), परी यादव (7), प्रिया वर्मा (8), रुद्र शाह (13) आणि प्राची यादव (7) यांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते.
दरम्यान, केकमध्ये मृत पाल आढळल्याचा दावा आणि त्यानंतर केक खाल्लेल्या व्यक्तींना प्रकृतीचा त्रास झाल्याने कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. मात्र, संबंधित व्यक्तींची प्रकृती नेमकी कोणत्या कारणामुळे बिघडली, याबाबत अद्याप अधिकृत वैद्यकीय अहवाल समोर आलेला नाही.
दरम्यान, या घटनेनंतर संबंधित दुकानातून विक्री करण्यात आलेल्या इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची अधिकृत पुष्टी तसेच संबंधित प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. घटनेच्या चौकशीत नेमकं काय निष्पन्न होतं आणि संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.