पालघरमध्ये मिंध्यांचा करेक्ट कार्यक्रम; भाजपने गट फोडला, स्वबळाचा नारा, 10 जिल्हा परिषद सदस्य, अनेक सरपंच-उपसरपंच गळाला

दाब-दबावाने दुसऱ्यांचे पक्ष फोडून त्यांच्या प्रवेशाचे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या मिंध्यांचा भाजपनेच करेक्ट कार्यक्रम केला. पालघरच्या विक्रमगडमध्ये गट फोडून भाजपने मिंधे गटाला जोरका झटका दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मिंध्यांचे ‘राईट हॅण्ड’ समजले जाणारे विक्रमगडमधील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह १० माजी जिल्हा परिषद सदस्य, शेकडो सरपंच-उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांना गळाला लावल्याने विक्रमगडमध्ये मिंधे गटाला भगदाड पडले. त्यातच भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई रजपूत यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा देत मिंध्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांना पक्षात घेऊन त्यांना मिंधेंनी मोठी पदे दिली. यामुळे मिंधे गटात कार्यरत असलेले प्रकाश निकम दुखावले. त्यांची ही खदखद पाहून भाजपने थेट त्यांना गळाला लावले आणि लगोलग त्यांचा पक्षप्रवेशही घडवून आणला. निकम यांनी अख्खा मिंधे गट भाजपवासी केला. मिंधे गटाचे आठ जिल्हा परिषद सदस्य, ४२ सरपंच आणि १४२ ग्रामपंचायत सदस्य भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे भाजपने दिलेल्या झटक्याने मिंधे गट भिरभिरला आहे.

डहाणूतही मिंधे गट फुटणार

मोखाडा तालुक्यापाठोपाठ डहाणूतही मिंधे गट फुटीच्या वाटेवर आहे. येथील मिंधे गटाचे महत्त्वाचे पदाधिकारी भाजपमध्ये पक्षप्रवेशाच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजप मिंधेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या तयारीला लागला आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Comments are closed.