वसईत देवीच्या मिरवणुकीवर हल्ला, रिक्षाचालकासह गुंडांचा राडा; पाच भक्त जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी वसईत ‘वसईची माता’ देवीच्या मिरवणुकीत हाणामारी झाली. हा प्रकार आंबाडी रोडवरील गुरुद्वाराजवळ माणिकपूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर झाला. रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदार गुंडांनी केलेल्या लाठ्या-काठ्या आणि कोयत्याने केलेल्या हल्ल्यात पाच देवीभक्त जखमी झाले आहेत. या राड्याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घटस्थापनेच्या दिवशी रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आनंदनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज सेवा संस्थेची देवी घेऊन जाणारा टेम्पो आंबाडी रोडवर थांबला असताना कुमार वरवी याच्या रिक्षाची टेम्पोला धडक बसली. त्यानंतर टेम्पोचालक शुभम देशमुख याने रिक्षाचालकाला जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन शिवीगाळ आणि झटापट झाली. शुभमची आई कविता देशमुख या वाद सोडवण्यासाठी मध्ये पडल्या असता रिक्षाचालकाने त्यांच्या हाताला जोरात चावा घेतला. यानंतर रिक्षाचालकाने फोन करून सिद्धेश पागे, तंगवेल, सिद्धेश राजपूत आणि अन्य दोघांना घटनास्थळी बोलावले. या सर्वांनी देवीच्या भक्तांवर लाठ्या-काठ्या आणि कोयत्याने हल्ला केला.

गुंडांच्या हल्ल्यात प्रथम पठारे, विनेश शिंदे, जित मालविया, शुभम देशमुख आणि कविता देशमुख हे जखमी झाले. याशिवाय मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही या गुंडांनी मारहाण केली.

गुंडांनी केलेल्या हल्ल्यात देवीच्या मूर्तीच्या बोटाचे नुकसान झाल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सी. व्ही. मोरे करीत आहेत.

Comments are closed.