तारापूरच्या ‘आरती ड्रग्ज’मध्ये वायुगळती, एचसीएल टाकी फुटली; धुरामुळे रहिवाशांचा श्वास कोंडला

तारापूर एमआयडीसीमधील आरती ड्रग्ज लिमिटेड या कंपनीमध्ये आज संध्याकाळी द्रव पदार्थाची साठवण टाकी (एचसीएल) अचानक फुटल्याने मोठ्या प्रमाणावर वायुगळती झाली. कंपनीतील कामगार व आजूबाजूच्या गावातील रहिवाशांचा धुरामुळे श्वास कोंडला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वायूचे व धुराचे लोट इतरत्र पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. दरम्यान, अग्निशमन दल तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन वायुगळतीवर नियंत्रण मिळवले.
आरती ड्रग्ज ही तारापूर एमआयडीसीतील टी-१५० या झोनमध्ये वादग्रस्त कंपनी आहे. यापूर्वीदेखील तेथे अनेक दुर्घटना घडल्या. आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास डायल्यूट एचसीएल टाकी फुटल्याने वायुगळती सुरू झाली. दाट धुरामुळे सालवड आणि शिवाजीनगरच्या जवळच राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कामगार व रहिवाशांचे डोळे चुरचुरू लागले, तर अनेकांच्या घशांमध्येही जळजळ जाणवली.
वारंवार घटना घडत असल्याने संताप
तारापूर एमआयडीसीतील आरती ड्रग्ज कंपनीमध्ये वारंवार वायुगळती तसेच अन्य घटना घडत असल्याने परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याच कंपनीत ब्रोमीन वायूची गळती झाली होती. अशा घटनांमुळे कामगारांसह नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
दोषींवर कारवाई करा
आरती ड्रग्जमध्ये वायुगळती सुरू झाली तेव्हा काही कामगार ड्युटीवर होते. मात्र पोलीस यंत्रणा व अग्निशमन दलाच्या जवानांनी या कामगारांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या वायुगळतीची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
Comments are closed.