Palghar News – विरार-वैतरणा स्थानकादरम्यान विद्युतपुरवठा खंडित, डहाणूकडे जाणारी वाहतूक खोळंबली

पश्चिम रेल्वेच्या विरार–डहाणू रेल्वे मार्गावर विद्युत पुरवठा अचानक खंडित झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. डहाणूपर्यंत धावणाऱ्या लोकल सेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम झाला आहे.
विद्युत पुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. डहाणूसाठी 3:45 ची सुटलेली लोकल विरार–वैतरणा दरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाल्याने वैतरणा रेल्वे स्थानकाजवळ अडकून पडली. घटनेनंतर जवळपास अर्धा तास उलटूनही लोकल सुरू झाली नव्हती, त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. उष्णतेमुळे आणि गर्दीमुळे अनेक प्रवासी अस्वस्थ झाले होते. या बिघाडाचा परिणाम विरार–डहाणू मार्गावरील लोकल आणि काही एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिवाळी सण आठवडाभरावर आला आहे. यामुळे आज रविवार असल्याने चाकरमानी दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. मात्र ऐनवेळी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने खरेदीसाठी निघालेल्या नागरिकांचा हिरमोड झाला.
Comments are closed.