सफाळे-विरार रो रो भरसमुद्रात दोन तास अडकली, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबल्याने हायड्रोलिक पाइप तुटला

सफाळे येथून आज संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास विरारच्या दिशेने नेहमीप्रमाणे रो रो बोट निघाली. पाऊस धो धो कोसळत होता. ही बोट विरारच्या नारिंगी जेट्टीजवळ येताच अचानक हायड्रोलिक पंपाचा पाइप तुटला आणि 200 प्रवाशांच्या काळजाचा अक्षरशः ठोका चुकला. भरसमुद्रात दीड ते दोन तास रो रो बोट अडकून पडली. हायड्रोलिक पाइप तुटल्यामुळे चालकाला बोट धक्क्यालादेखील लावता येत नव्हती. बोटीतील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच देवाचा धावा केला. धक्कादायक बाब म्हणजे पाइप दुरुस्त करण्याची कोणतीही सोय बोटीत नव्हती. अखेर बोटीतील कर्मचाऱ्यांना भरतीची वाट पाहावी लागली. पाण्याची पातळी वाढल्यानंतर बोटीत अडकलेल्या सर्व प्रवाशांना जेट्टीवर सुखरूप उतरवण्यात आले. मात्र या थरार घटनेमुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
म्हारंबळपाडा-जलसार रो रो बोट ठरलेल्या वेळापत्रकानुसार जलसार येथून सायंकाळी विरारच्या दिशेने निघाली. ही बोट नारिंगी जेट्टीजवळ आली असता बोटीचा हायड्रोलिक पंप फुटला. त्यामुळे रॅम खाली न आल्याने बोट जेट्टीच्या धक्क्याला लागली नाही. सायकलच्या ट्यूब पाईपला बांधून त्यांनी दुरुस्तीचा प्रयत्न केला. मात्र कर्मचाऱ्यांना यश आले नाही. धो धो पाऊस सुरू झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.
कर्मचाऱ्याने केली दमदाटी
म्हारंबळपाडा-जलसार रो रो बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरले जात आहेत. आजही या बोटीत प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यामुळेच तांत्रिक बिघाडाचा प्रकार घडला असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. याच बोटीतून दैनिक ‘सामना’चे प्रतिनिधी मनीष म्हात्रे हे प्रवास करीत होते. त्यांनी याबाबत बोटीवरील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता निजाई नावाच्या एका कर्मचाऱ्याने त्यांना दमदाटी केली. काय बिघाड झाला आहे, असे विचारणाऱ्या प्रवाशांबरोबर बोटीवरील कर्मचारी उद्धट वर्तन करीत होते.
दीड तासाने झाली सुटका
हायड्रोलिक यंत्रणा दुरुस्त होत नसल्यामुळे बोट जेट्टीच्या धक्क्याला लागली नाही. त्यामुळे भरतीच्या पाण्याची पातळी वाढण्याची वाट बोटीवरील कर्मचाऱ्यांना पाहवी लागली. दीड ते दोन तासानंतर भरतीची पाणी पातळी वाढल्यानंतर रॅम दोरांनी बांधण्यात आला आणि प्रवाशांना जेट्टीवर उतरवले गेले.
Comments are closed.