सात वर्षांनी बाळ झालं, 21 व्या मजल्यावरून आईच्या हातून निसटलं आणि सात महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत

विरारमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. आईच्या हातून निसटल्याने इमारतीच्या 21व्या मजल्यावरून पडून सात महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. विरार पश्चिमेकडील जॉय विला कॉम्प्लेक्समधील पिनॅकल सोसायटीत बुधवारी दुपारी ही घटना घडली.
विकी सेदानी आणि पूजा सेदानी हे दाम्पत्य पिनॅकल सोसायटीतील 21व्या मजल्यावर राहत होतं. सेदानी जोडप्याला लग्नानंतर सात वर्षांनी आई-बाबा होण्याचं सुख लाभलं होतं. बुधवारी दुपारी त्यांच्या सात महिन्यांच्या मुलाला झोप येत नसल्याने त्याला कुशीत बेडरुममध्ये फिरत होत्या. यावेळी हवा येण्यासाठी त्यांनी बेडरुमधील बाल्कनीची स्लाईडींग उघडी ठेवली होती.
बेडरुममधून फिरत असताना पूजा यांचा पाय घसरला आणि त्या बाल्कनीच्या दिशेने पडल्या. यावेळी त्यांच्या हातातील सात महिन्यांचे बाळ बाल्कनीतून थेट खाली पडले. बाळाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे सेदानी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Comments are closed.