सूर्या प्रकल्पग्रस्तांना 30 वर्षांनंतरही फुटकी कवडी नाही; प्रकल्पग्रस्त आंदोलन छेडणार, पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक

पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील गोवणे, साखरे आणि वणई या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सूर्या प्रकल्पासाठी पाटबंधारे विभागाने संपादित केल्या. मात्र ३० वर्षे उलटून गेली तरी अद्यापही प्रकल्पग्रस्तांना फुटकी कवडी मिळालेली नाही. याविरोधात प्रकल्पग्रस्तांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडक देत मोबदला लवकर मिळाला नाही तर आंदोलन छेडू, असा इशारी दिला आहे.

गोवणे, साखरे व वणई हद्दीतून गेलेल्या सूर्या प्रकल्पाच्या कालव्यांसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र जमिनी बाधित होऊनही प्रशासन मोबदला देत नसल्याने प्रकल्पग्रस्तांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेली ३० वर्षे केवळ अधिकाऱ्यांनी आश्वासनांवर आश्वासने दिली असली तरी अद्याप एक रुपयाही मोबदला दिला नाही, असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पग्रस्त विलास सुमडा यांच्यासह बाधितांनी सूर्या धरण प्रकल्प डहाणू पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता गौरव कुळे आणि शाखा अभियंता दीपक शिंदे यांची भेट घेतली.

समस्यांचा पाढा वाचला

यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या व्यथा, उपासमारीचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला. याप्रसंगी गोवणे उपसरपंच संदीप ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य विनायक मालकरी, पुरुषोत्तम पाटील, हरेश्वर राऊत आदी उपस्थित होते. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना केल्या नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी पाटबंधारे विभागाला दिला आहे.

Comments are closed.