Palghar News – डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये बिघाड, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय

डहाणूहून विरारकडे जाणाऱ्या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मंगळवारी सायंकाळी 5.45 वाजताची लोकल पालघर रेल्वे स्थानकात अचानक बंद पडली. या लोकलचा ब्रेक जाम झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे विरार-चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. ऐन गर्दीच्या वेळी लोकल बंद पडल्याने पालघर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली.

अखेर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून 6 वाजून 22 मिनिटांनी चर्चगेट लोकल सुरू करण्यात आली. मात्र, गर्दीमुळे प्रवाशांना गाडीत चढणे कठीण झाले आणि अनेकांना प्रवास करता आला नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर लोकलमध्ये बिघाड झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्याही काही काळ धीम्या गतीने सुरू होत्या. ऐन गर्दीच्या वेळी लोकलमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास झाला. सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून गाड्या सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते.

Comments are closed.