पालीतील वजरोली स्मशानभूमीला मरणकळा; शेड मोडकळीस, जागोजागी खड्डे, वीज गायब, पाणी नाही

रोहा तालुक्यातील पाटणसई ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे वजरोली स्मशानभूमीला मरणकळा लागल्या आहेत. शेड मोडकळीस, जागोजागी खड्डे, वीज गायब, पाणी नसल्यामुळे स्मशानभूमीची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्यास अनेकदा पाऊस जाईपर्यंत अंत्ययात्रा थांबवावी लागते. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

वजरोली गावच्या स्मशानभूमीवरील पत्र्याची शेड मोडकळीस आली आहे. शिवाय अनेक पत्रे तुटले आहेत. त्यातच पावसामुळे स्मशानभूमीत जागोजागी खड्डे पडले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून स्मशानभूमीची दुरुस्ती केलेली नाही. आसन व्यवस्था नाही. नातेवाईकांना उभे राहूनच अंत्यविधी पार पाडावा लागतो. तसेच रात्रीच्या वेळी लाईट नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान गावकऱ्यांना मरणानंतरही मरणयातना सहन कराव्या लागत आहे. या समस्येची गंभीर दखल घेऊन ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून दुरुस्तीचे काम सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेश कासार यांनी केली आहे.

या आहेत मागण्या
ग्रामपंचायतीने मजबूत व पावसापासून संरक्षण करणारे नव्याने पत्र्याचे शेड उभारावे, लाईटची व्यवस्था करावी, दशक्रिया विधीसाठी ओटे व त्यावर शेडची व्यवस्था करावी, स्मशानभूमीला गेट लावावे, परिसरात पेव्हर ब्लॉक बसवावे, अंत्यविधी आणि दशक्रिया करताना पाण्याची सोय उपलब्ध करावी आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.

Comments are closed.