पनामा कालव्यावरील प्रमुख पुलाजवळ इंधन टँकरचा भीषण स्फोट; आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने ‘ब्रिज ऑफ द अमेरिकाज’ तात्पुरता बंद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पनामा कालव्याच्या पॅसिफिक प्रवेशद्वारावर असलेल्या ऐतिहासिक ‘ब्रिज ऑफ द अमेरिकाज’ जवळ सोमवारी एका इंधन टँकरचा भीषण स्फोट होऊन मोठी आग लागली. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आगीचे लोट पुलाच्या मुख्य भागापर्यंत वेगाने पसरल्याने पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट इतका भीषण होता की आगीचे लोट थेट पुलावरील रस्त्यापर्यंत पोहोचले. अचानक लागलेल्या या आगीमुळे पुलावरून प्रवास करणाऱ्या चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि जीव वाचवण्यासाठी लोकांची धावपळ उडाली. या आणीबाणीच्या परिस्थितीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुलावरील वाहतूक तात्पुरती थांबवली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केले असून, विशेष तांत्रिक पथकांकडून पुलाच्या संरचनेची आणि मजबुतीची तपासणी केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे. जोपर्यंत पुलाच्या सुरक्षिततेची खात्री पटत नाही, तोपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी बंदच राहणार आहे.

‘ब्रिज ऑफ द अमेरिकाज’ हा 1,654 मीटर लांबीचा पूल पनामा कालव्यावरील अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. विशेषतः मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी केल्यापासून, अमेरिकेच्या कच्च्या तेलाची आशियाकडे होणारी वाहतूक पनामा कालव्यामार्गे वाढली होती. या पार्श्वभूमीवर जागतिक जलवाहतुकीच्या महत्त्वाच्या केंद्राजवळ झालेली ही दुर्घटना चिंतेचा विषय ठरत आहे. सध्या स्थानिक अधिकारी बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत असून जखमींवर उपचार सुरू आहेत.

Comments are closed.